
घरी नसलात तरी इमारतीसाठी मागवण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरचे पैसे रहिवाशाला द्यावेच लागतील, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
पाण्याचा टँकर मागवला तेव्हा मी घरी नव्हतो. याचे पैसे मी देणार नाही, असा दावा एका रहिवाशाने केला होता. हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. घरी नव्हतो, अशी सबब देऊन रहिवासी टँकर मागवण्यासाठी सोसायटीने प्रत्येक सभासदाला आकारलेले पैसे नाकारू शकत नाही, असे न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
महेश परमार यांनी ही याचिका केली होती. परमार यांच्याकडून थकीत मेंटेनन्स वसूल करण्यास निबंधकांनी सोसायटीला परवानगी दिली. अपील प्राधिकरणाने त्यावर शिक्कामोर्तब केले. याला परमार यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले होते.
ठराव बंधनकारक
पाण्याच्या टँकरचे पैसे सभासदांकडून घेण्याचा ठराव सोसाटीने केला असल्यास तो प्रत्येक रहिवाशासाठी बंधनकारक आहे. हे पैसे सर्व सभासदांकडून सम प्रमाणात घेतले जातात. त्यामुळे है पैसे रहिवाशाला द्यावेच लागतील, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सोसायटीचा दावा
परमार यांचा मेंटेनन्स थकला होता. नियमानुसार ठराव करून सोसायटीने शुल्क आकारले आहेत. यात काहीच दोष नाही, असा दावा सोसायटीने केला होता.
























































