
कुळगाव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील बेकायदा बांधकामांबाबत माहिती देण्याचे आदेश देऊनही टाळाटाळ करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना हायकोर्टाने आज फैलावर घेतले. न्यायालयाच्या आदेशाबाबत अधिकाऱ्यांना अजिबात गांभीर्य नाही. याउलट प्रशासनाचा खूपच अनौपचारिक दृष्टिकोन दिसून येतो याचे आम्हाला खरोखरच आश्चर्य वाटते, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत न्यायालयाने, बदलापूरमधील अनधिकृत बांधकामाची दोन आठवड्यांत माहिती द्या नाही तर अवमानाची कारवाई करू अशी सक्त ताकीद नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली.
बदलापूर येथे ए प्लस लाईफ स्पेसेस या विकासकाकडून बांधकाम करण्यात आले असून सोसायटीचे सांडपाणी त्रिशूल गोल्डन विले गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात वाहून आल्याने यशवंत भोईर यांनी याप्रकरणी हायकोर्टात अॅड. अविनाश फटांगरे आणि अॅड. अर्चना शेलार यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर हायकोर्टात आज मंगळवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 14 ऑगस्ट रोजी न्यायालयाने बदलापूरमधील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करून त्याविरुद्ध काय कारवाई केली त्याचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश दिले होते.




























































