
व्यवसाय चांगला सुरू असताना त्याला कॅसिनो जुगाराची सवय लागली. त्यात तो पंगाल झाला. मग झटपट पैसा कमावण्यासाठी त्याने सोनसाखळी चोरण्यास सुरू केली. त्यात तो यशस्वी होऊ लागला. नवी मुंबई पोलीस, गोवंडी पोलीस, गुन्हे शाखेची पथके त्याचा शोध घेऊ लागली. पण अचूक शोध घेत शीव पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या.
मोहन कोकाटे (48) असे त्या हायप्रोफाईल सोनसाखळी चोराचे नाव आहे. मोहनने गेल्या महिन्यात बेलापूर, कोपर खैराणे, रबाळे येथे सोनसाखळी चोरली. नवी मुंबई पोलीस मागे लागल्यानंतर तो मुंबईत आला. गोवंडीत त्याने चोरी केली. मग शीव येथे महिलेचे मंगळसूत्र चोरून तो सटकला. या प्रकरणी माहिती मिळताच गुन्हा नोंदवून वपोनि अनंत सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, उपनिरीक्षक अतुल ठोंबरे, किरण भोसले तसेच संदीप जाधव, संदीप पाटील, चुडनाईक, धुम, मोकल, बोर्गे, डबडे, जाधव या पथकाने चोराचा शोध सुरू केला. ठाण्याच्या तीन हात नाका येथे येऊन शोध थांबला. पुढे तो कुठे गेला ते समजतच नव्हते.
चप्पलवरून ओळखले
आरोपी सोनसाखळी चोरल्यानंतर दुचाकी एकेठिकाणी लावून निघून जायचा. दोन तीन दिवस तो दुचाकीजवळ फिरकायचाच नाही. त्यामुळे त्याला शोधणे मुश्किल झाले होते. दरम्यान तीनहात नाका येथे शोध थांबल्यानंतर पथकाने पायी तपास सुरू केला. शास्त्राrनगरात ती दुचाकी पथकाला दिसली. पोलिसांनी वॉच ठेवून फुटेजप्रमाणे त्याच्या पायातली चप्पल ओळखून पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.


























































