परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचा सिंधुदुर्गात धुमाकूळ; मासळीची लूट

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी करत धुमाकूळ घातला आहे. झुंडीने दाखल होणारे हे ट्रॉलर मासळीची लूट करत असून समुद्रात मासेमारी करणाऱ्या सिंधुदुर्गातील मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान करत आहेत.

परराज्यातील कोणत्याही मासेमारी नौकेला महाराष्ट्र सागरी हद्दीत 12 सागरी मैल आत येऊन मासेमारी करण्यास मनाई आहे. असे असताना परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर घुसखोरी करत आहेत. रात्रीच्या वेळी दिवे बंद करून हे ट्रॉलर मासेमारी करतात. यावेळी स्थानिक मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात टाकलेल्या जाळ्यांवरून हे ट्रॉलर जात असल्याने जाळी तुटून नुकसान होत आहे. या प्रकारामुळे मच्छिमार हवालदिल झाले असून भीतीचे वातावरण आहे. मत्स्य विभागाने कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

मालवण येथील मच्छिमार संतोष देसाई यांच्या मालकीची ‘पावणाई’ नौका समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. देवबाग समुद्रात 16 वाव खोल भागात मासेमारी दरम्यान मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास 15 ते 16 मोठ्या हायस्पीड नौका दिवे बंद करून आल्या व जाळ्यांवरून गेल्या. यात आठ जाळी तुटून देसाई यांचे सुमारे 70 हजार ते एक लाख नुकसान झाले आहे.

हायस्पीड ट्रॉलरकडून मध्यरात्री मालवण देवबाग किनारपट्टी भागात आपल्या ‘पावणाई’ या मासेमारी बोटीवरील आठ मासेमारी जाळी तोडून नुकसान करण्यात आले आहे, अशी तक्रार गवंडीवाडा, मालवण येथील संतोष देसाई यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीत काही हायस्पीडची नावेही देण्यात आली आहेत. तर सिंधुदुर्ग सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त मालवण कार्यालय येथेही तक्रार निवेदन देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या