
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 100 फुट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या भव्यदिव्य ध्वजस्तंभावर हिंदुस्थानचा तिरंगा रविवारी दिमाखात फडकला. प्रत्येक हिंदुस्थानींच्या मनात राष्ट्रभक्तीचा रोमांच निर्माण करणारा हा ध्वज रत्नागिरीकरांची शान ठरणार आहे. भव्य ध्वजस्तंभाचे लोकार्पण पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री म्हणाले ध्वजस्तंभ उभा राहावा हि श्री गणेशाची इच्छा होती. इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 100 फुट उंच ध्वज उभारण्यात आलेला ध्वज रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. असेही वायकर म्हणाले . यावेळी विधानपरिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना वायकर म्हणाले, गेली पाच वर्षे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कार्य करताना या जिल्ह्यातील नागरिकांनी व माझ्या सहकाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केले. अनेक विविध प्रसंगामध्ये या जिल्ह्यातील नागरिकांनी आलेल्या संकटाला धैर्याने तोंड दिले. निर्सगाचे वरदान लाभलेल्या या जिल्ह्याचा विकास सदैव होत राहील, असेही त्यांनी सांगितले.
हा राष्ठ्रध्वज वायकर व उपस्थित मान्यवरांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर तांत्रिक पध्दतीने तो ध्वजस्तंभावर चढविण्यात आला.





























































