मुंबईला वीजपुरवठा करणारे हायटेन्शन टॉवर मजबूत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला वीजपुरवठा करणाऱया टाटा पॉवरच्या उच्चदाब वीज वाहिन्यांचे जाळे आणखी मजबूत होणार आहे. टाटा पॉवरकडून तीन हजार हायटेन्शन टॉवरच्या माध्यमातून 110 केव्ही वीज वाहिनीद्वारे वीज वाहून आणली जाते. सदर टॉवरपैकी अनेक टॉवर जुने झाले आहेत. त्यामुळे ते काढून नवीन उभारण्यासाठी मोठा खर्च असून त्याचा परिणाम मुंबईच्या वीजपुरवठय़ावर होणार आहे. त्यामुळे टाटा पॉवरने सध्याच्या टॉवरमध्येच नवीन टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा पॉवरकडून मुंबईला दररोज सुमारे 1450 मेगावॅट वीजपुरवठा केला जात असून ती वाहून आणण्यासाठी टाटा पॉवरच्या 110 केव्हीच्या उच्चदाब वीज वाहिन्या आहेत. सदर वीज वाहिन्या असलेले अनेक टॉवर 25-30 वर्षे जुने झाले आहेत. त्यामुळे ती बदलण्याची योजना टाटा पॉवरने आखली आहे. मात्र वीजपुरवठा सुरू ठेवून काम करावे लागणार आहे. तसेच मुंबई परिसरात नवीन जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे टाटा पॉवरने जुन्या टॉवरच्या आतमध्ये नवीन टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.