
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धलियारा येथील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या ‘खूनी मोर’ जवळ भीषण अपघात घडला आहे. राष्ट्रीय महामार्ग 503 वर राधा स्वामी सत्संग गृहाजवळ भाविकांनी भरलेली एक ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन सुमारे 90 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 27 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कपूरथला येथील भाविकांचा एक गट ट्रॅक्टर-ट्रॉलीने हिमाचल प्रदेशातील शक्तिपीठांच्या दर्शनासाठी आला होता. या भाविकांनी सुरुवातीला चिंतपूर्णी मंदिरात दर्शन घेतले आणि त्यानंतर ते ज्वालामुखी मंदिराच्या दिशेने जात होते. धलियारा येथील तीव्र उताराच्या आणि वळणदार ‘खूनी मोर’ जवळ पोहोचताच ट्रॅक्टरचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्यामुळे भरधाव ट्रॅक्टर-ट्रॉली थेट 90फूट खोल दरीत कोसळली.
अपघातानंतर घटनास्थळी मोठा आक्रोश आणि आरडाओरडा ऐकू येत होता. ही भीषण दुर्घटना पाहताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि खड्ड्यात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्याला वेग देण्यात आला. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.



























































