हिमालयाची शिखरं वितळताहेत, गंगेसह प्रमुख नद्या आटणार! शास्त्रज्ञांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं विलोभनीय दिसतात. त्यांच्यावर साचणाऱ्या बर्फामुळे इथे वाहणाऱ्या नद्या बाराही महिने प्रवाहित असतात. पण, हे चित्र हळूहळू बदलत असल्याचा गंभीर इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

नेचर जर्नलने प्रकाशित केलेल्या एका अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. इंग्लंड येथील यूनिव्हर्सिटी ऑफ लीड्सच्या शास्त्रज्ञांनी हा स्टडी अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, हिमालयाची शिखरं जगातील अन्य शिखरांच्या तुलनेने अधिक वेगाने वितळत आहेत.

मानवी इतिहासात जेव्हा छोटं हिमयुग आलं होतं. तेव्हा हिमशिखरं वितळण्याचं प्रमाण अत्यल्प होतं. त्यानंतर झालेल्या बदलांचा आढावा शास्त्रज्ञांनी घेतला. त्यांनी हिमालयाच्या 14 हजार 798 हिमशिखरांचं अध्ययन केलं. त्यांचा पृष्ठभाग, बर्फाची पातळी, रुंदी, जाडी आणि वितळण्याचा वेग यांचा अभ्यास करण्यात आला.

या शास्त्रज्ञांनी या अभ्यासांती काही इशारे दिले आहेत. यात सगळ्यात गंभीर इशारा ग्लेशियर वितळण्याचा आहे. हिमयुगात बर्फ वितळण्याचा कमी झालेला वेग गेल्या काही वर्षांत दसपटीने वाढला आहे. त्यामुळे हिमशिखरांनी आपला 40 टक्के भाग गमावला आहे. ही हिमशिखरं 28 हजार चौ किमी पासून 19 हजार 600 किमीपर्यंत आली आहेत. या शिखरांवरून 390 क्युबिक किमी ते 590 क्युबिक किमी इतका बर्फ वितळून गेला आहे. हा बर्फ वितळल्याने जे पाणी वाहून गेलं त्या पाण्यामुळे समुद्राच्या पातळीत 0.92 मिलीमीटर ते 1.38 मिलीमीटर इतकी वाढ झाली आहे.

आर्क्टिक आणि अंटार्टिकानंतर सर्वात जास्त बर्फ हा हिमालयावर आहे. त्यामुळे अनेकदा त्याला तिसरा ध्रुव देखील म्हटलं जातं. पण, हा बदल झाल्याने भविष्यात अनेक आशियाई देशांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू शकते. कारण, आशियाच्या प्रमुख नद्यांमध्ये ग्लेशियरमधून वितळणाऱ्या बर्फाचं पाणी आहे. यात प्रामुख्याने गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधु या तीन नद्यांचा समावेश होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळल्याने भविष्यात हिंदुस्थान, नेपाळ, चीन, बांग्लादेश, भूतान, पाकिस्तान या देशांसह अनेक देशांना पाण्याचा भीषण तुटवडा जाणवू शकतो. कारण, या देशांमधील प्रमुख नद्या या हिमालयाच्या ग्लेशियरमध्येच उगम पावतात.

वातावरणातील बदलांमुळे अनेक हिमशिखरं वितळून त्यांच्या मध्य पायथ्याशी छोटी सरोवरं निर्माण झाली आहेत. ही सरोवर अत्यंत धोकादायक आहेत. कारण, पर्वताच्या मध्यावर अशा प्रकारे तयार झालेल्या सरोवरांचे बांध कधीही फुटू शकतात आणि त्यातून पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन केदारनाथ किंवा रैणीसारखी दुर्घटना उद्भवू शकते, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.