
हिंदी मालिकांमध्ये छोटामोठा रोल करणारे कलाकार चक्क अट्टल ठग निघाले आहेत. भिमराज मालजी (31), प्रवीण वर्मा (29), मल्लेश डिंगी (47) आणि चकडप्पा कालोर (38) अशी या आरोपींची नावे आहेत. मालिकांमधील कथानकांचा वापर करून हे ठग व्यापाऱ्यांना फसवत असल्याचे उघडीस आले असून त्यांच्याकडून शिळ-डायघर पोलिसांनी बनावट चलन, बनावट सोन्याची बिस्किटे, गुन्ह्यात वापरलेले 10 मोबाईल, 253 सिमकार्ड आणि 28 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
मुंबईतील कुर्ला भागात राहणारे निशात शेख यांचा चामड्याच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी त्यांना भिमराज याने मोबाईलवर संपर्क साधून चांगल्या प्रतिचे चामडे उपलब्ध असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे दोन लाख रुपये घेऊन कल्याण फाटा येथे आलेल्या निशाद यांना गोडाऊन दाखवण्याची बतावणी भिमराज याने केली. त्याचवेळी भिमराजचे दोन साथीदार एका रिक्षामधून काठी घेऊन आले. त्यांच्यासोबत भिमराज याने पैसे घेऊन पळ काढला.























































