मानसरोवरावर होमहवन करण्यास चीनने रोखले

757

श्रावण महिन्यात पवित्र सोमवारी कैलास मानसरोवरावर हिंदुस्थानी भाविक नेहमीप्रमाणे होमहवन करायला गेले, मात्र चिनी सैनिकांनी त्यांना रोखले. दरवर्षी मानसरोवर यात्रेसाठी चीन सरकारच व्हिसा देते. हिंदुस्थानचे भाविक या कालावधीत आमच्या देशात येतात. त्यांनी आमच्या नियम आणि कायद्यानुसार वागायला हवे. आम्हीही हिंदुस्थानात गेलो तर तेथे त्यांच्याच नियमांचे पालन करतो, असे चीनमधील अली प्रीफेक्चर भागाचे डेप्युटी कमिशनर जी. किंगमिन यांनी स्पष्ट केले.

कैलाश मानसरोवर हा परिसर आमचा आहे. तेथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षा आणि सोयीसुविधांवर आम्ही पूर्ण लक्ष देतो. मात्र हिंदुस्थान सरकारनेही आपल्याकडून या भागात यात्रेकरूंच्या सोयीसाठी चांगल्या मूलभूत सेवासुविधा पुरविल्या पाहिजेत, असे सांगून ‘उत्तराखंड येथून मानसरोवर येथे येण्यासाठी भाविकांना 4 ते 5 दिवस लागतात. त्यात त्यांची मोठी ऊर्जा खर्च होते. त्यामुळे त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत’, असेही किंगमिन म्हणाले. कैलास पर्वतावर भगवान महादेवाचे वास्तव्य असल्याची धारणा आहे. याच पर्वतावर माता राणी महामाया हिच्या पोटी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाल्याचे बौद्ध बांधव मानतात, तर जैनांचे म्हणणे आहे की, तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांना कैलास पर्वताजवळील अष्टपद पर्वतावर मोक्ष मिळाला होता. त्यामुळे कैलास मानसरोवरावर दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळात हिंदुस्थानी भाविक पूजाअर्चा करतात.

आपली प्रतिक्रिया द्या