
हिंगोली जिल्ह्यात तीन एसआरपीएफ जवानासह जालना येथील एसआरपी जवानाच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल आज गुरुवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी सकाळी प्राप्त झाला असून हे चार जण कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या 21 झाली असून त्यापैकी एक रुग्णाने कोरोनावर मात केली आहे.
मालेगाव व मुंबई येथे बंदोबस्ताला गेलेल्या एसआरपीएफ जवनांपैकी आतापर्यंत 16 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये हिंगोलीचे 15 तर जालना येथून हिंगोली तालुक्यात गावी आलेल्या एका एसआरपी जवानाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये मालेगावातून आलेले 13 तर मुंबईहून परतलेल्या 3 जणांचा समावेश आहे. जालना येथील जवानाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या चार वर्षीय पुतण्याला कोरोना झाला होता. तर संभाजीनगरहून आई-वडिलांसह सेनगाव तालुक्यात परतलेला 5 वर्षाचा बालक कोरोनाग्रस्त झाल्याचे मंगळवारी समोर आले.
बुधवारी म्हणजेच 29 एप्रिल रोजी सोलापुर जिल्ह्याच्या बार्शी येथुन वसमत आलेला 21 वर्षीय तरुण व मुंबई येथून आलेल्या एका एसआरपी जवानाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आज सकाळी एसआरपीचे तीन जवान व जालनाच्या जवानाच्या संपर्कातील एक व्यक्ती अशा दोन जणांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. व्यक्ती संपर्कातून दोन जणांना हिंगोलीत कोरोना झाल्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात आजवर कोरोनाची रुग्ण संख्या 21झाली असून त्यापैकी 1 रुग्ण बरा झाला आहे.






























































