हिंगोली जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

गेल्या ७० वर्षापासुन धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. राज्य घटनेनुसार धनगड ऐवजी धनगर असा बदल करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक पारीत करुन धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदनही धनगर समाज बांधवाच्या वतीने देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील पाचही तहसील कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला.

हिंगोली व कळमनुरी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भेट देऊन धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जाहीर पाठींबा देऊन मार्गदर्शन केले. हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर तर कळमनुरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर, सेनगाव येथे तहसील कार्यालयावर, वसमत येथे उपविभागीय कार्यालयावर, औंढा नागनाथ येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढुन आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. धनगर समाजाला गेल्या ७० वर्षापासुन धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्य घटनेनुसार धनगड ऐवजी धनगर असा बदल करण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक पारीत करावे तसेच राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणाही केली होती. पण, भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसात म्हणजे पहिल्या कॅबिनेट मिटींगमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करणार अशी घोषणा केली होती.

पण, ४ वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही. याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे भाजप सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाज बांधवांनी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहापासुन मोर्चाला सुरुवात केली. हा मोर्चा शहरातील विविध मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी या मेळाव्याला पाठींबा दर्शवत मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक प्रतिनिधी राम कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये सकल धनगर समाज बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. या निवेदनावर अ‍ॅड. जी.बी. ढाले, अशोकराव श्रीरामे, शशिकांत रामराव वडकुते, शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक, विनोद नाईक, शिवाजी ढाले, संभाजी देवकते आदींची उपस्थिती होती.

कळमनुरी – तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर २७ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा सामाजिक सभागृह ते उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी येथे धडकला. महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यातील आज जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयावर धनगर समाज बांधवांनी मोर्चा काढुन तात्काळ धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच शिवसेनेच्या वतीने धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जाहीर पाठींबा देऊन मार्गदर्शन केले. तसेच कळमनुरी येथील वकील संघाने धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक दिवस न्यायालयीन कामकाज बंद करत जाहीर पाठींबा वकील संघाने दिला आहे. दरम्यान, धनगर समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन कळमनुरी येथील तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थी, युवक, महिला, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कर्मचारी-अधिकारी, राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.