पोलीस अधीक्षकांची धडाकेबाज कारवाई, अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट सुरु आहे. मात्र पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी पदभार स्विकारताच कठोर पाऊले उचलल्याने अवैद्य धेंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकून मटका, जुगार,दारू, गुटखा तस्करी प्रकरणी ऑगस्ट महिन्यात 119 गुन्हे दाखल करत 227 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे अधिक्षकांनी सुरु केलेल्या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी 28 जुलै रोजी कार्यभार स्विकारला आणि पहिल्याच गुन्हे आढावा बैठकीत जिल्यात बिनबोभाट सुरु असलेल्या मटका, जुगार, सट्टा, अवैध दारु विक्री, गुटख्याची तस्करी यासारखे बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याचे फर्मान सोडले. जिल्ह्यात ऑगस्ट या एकाच महिन्यात 13 पोलीस ठाण्यांमध्ये अवैध दारु विक्रीचे 69 गुन्हे दाखल करुन 75 जणांना अटक करत 2 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारु विक्रीच्या 9 ठिकाणी छापे मारुन 10 जणांना अटक करत मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 28 मटका व जुगार अड्यांवर छापा टाकून 104 जणांना अटक केली असून 4 लाख 57 हजार 282 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर वाहतुक नियमांचे उल्लंघन आणि चालक परवाना न बाळगता वाहन चालविणाऱ्या 563 जणांकडुन 1 लाख 71 हजार रुपयांचा दंड शहर वाहतुक शाखेसह विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वसुल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. आणि हि कारवाई असीच सुरु ठेवण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.