
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली तालुकाध्यक्षांच्या निवडीवरुन खासदार राजीव सातव यांनी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गोरेगावकरांनी प्रतिनिधीत्व केलेल्या विधानसभा क्षेत्रातील हिंगोली, सेनगाव, हिंगोली शहरच्या अध्यक्ष निवडीवर प्रदेश काँग्रेसची मोहर उठवुन सातव समर्थकांची वर्णी लावण्यात आली आहे. तिघांना आज नव्याने नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षांतर्गत सातव व गोरेगावकर या दोघांमध्ये गटबाजी सुरु आहे. जनसंघर्ष यात्रेचे निमित्त आणि निवडणुकीचा हंगाम जवळ आल्यामुळे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. सातवांचा ४ वर्षापासुन संपर्क सुरु असला तरीही पक्षीय कार्यक्रम व जनसंपर्कापासुन लांब असलेले गोरेगावकर हे देखील सक्रिय झाले. खासदारांनी जनसंघर्ष यात्रेसाठी बैठक घेतल्यावर माजी आमदार गोरेगावकर यांनी देखील निवासस्थानी बैठक घेत शक्ती प्रदर्शन केले. या घटनेला तीन दिवस उलटले नाहीत. दरम्यान, हिंगोली विधानसभा क्षेत्रातील हिंगोलीच्या तालुकाध्यक्ष पदी श्याम जगताप, सेनगावला तालुकाध्यक्ष म्हणुन कुणी विनायक देशमुख नावाचे काँग्रेस कार्यकर्ते तर हिंगोली शहराध्यक्ष पदी बापुराव बांगर यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या संमतीने सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्याकडे धाडले आहे. तीनही पदावर सातव समर्थकांची वर्णी लागली आहे. जगताप, देशमुख व बांगर यापुर्वीच या पदावर होते. मात्र, प्रदेश काँग्रेसकडुन शिक्कामोर्तब करवुन घेत आज तिघांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्तीपत्र देतांना काँग्रेस आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, विलास गोरे, निहाल शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.






























































