
एप्रिल महिन्यात जेट इंधनाच्या दरात ११५% पर्यंत ऐतिहासिक वाढ झाली आहे. दिल्लीतील देशांतर्गत विमानांसाठी एटीएफचे दर गेल्या महिन्यातील ९६,६३८.१४ रुपयांवरून वाढून २,०७,३४१.२२ रुपये प्रति किलोलिटर झाले आहेत. मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. या किमतींमुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भारतीय विमान वाहतूक इतिहासात प्रथमच जेट इंधनाचे दर २ लाख रुपये प्रति किलोलिटरच्या पुढे गेले आहेत.
दिल्ली देशांतर्गत विमानांसाठी एटीएफचे दर गेल्या महिन्यातील ९६,६३८.१४ रुपयांवरून २,०७,३४१.२२ रुपये प्रति किलोलिटर (KL) पर्यंत वाढले आहेत. ही अंदाजे ११४.५% ची वाढ आहे. तर मुंबईमध्ये दर ११५% नी वाढून १,९४,९६८.६७ रुपये प्रति किलोलिटर झाले आहेत. याबरोबरीने चेन्नई आणि कोलकाता येथेही इंधनाच्या किमतींनी २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
जेट इंधनाचा वाटा आधीच विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चाच्या ४०-४५% असतो. या प्रचंड दरवाढीमुळे लहान विमान कंपन्यांना आपले कामकाज चालू ठेवणे जवळजवळ अशक्य होईल. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, युद्धामुळे युरोप आणि अमेरिकेला जाणारी विमाने आधीच लांबच्या मार्गाने जात आहेत, ज्यामुळे इंधनाचा वापर आणखी वाढत आहे. वाढता खर्च आणि मागणीतील संभाव्य घटीमुळे विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाणांचे वेळापत्रक कमी करण्यास भाग पडू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
येत्या काही दिवसांत विमानप्रवासाची योजना आखत असाल, तर तुम्हाला जास्त भाडे मोजावे लागू शकते. विमान कंपन्या आता हा वाढीव खर्च प्रवाशांवर लादतील. २१ मार्च २०२६ रोजी, सरकारने देशांतर्गत विमानप्रवासावरील १८,००० रुपयांची भाडे मर्यादा हटवली, ज्यामुळे तिकिटांच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा यांसारख्या विमान कंपन्या आधीच १५० ते २०० रुपयांपर्यंत इंधन अधिभार आकारतात, ज्यात आणखी वाढ होऊ शकते.




























































