
मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला माहीम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात आला आहे. त्यासंदर्भात मंत्रालयात येत्या आठवडय़ात बैठक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज माहीम किल्ल्याच्या परिसराची पाहणी केली.
या भेटीनंतर बोलताना आशीष शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या किल्ल्यात वर्षानुवर्षे खूप मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत होते. मुंबई महापालिकेने या ऐतिहासिक वास्तूला अतिक्रमणापासून मुक्त करण्याचे काम केले. त्यामुळे माहीमचा किल्ला आज मोकळा श्वास घेतो आहे.
आता यापुढे किल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण मुंबई महापालिका आणि पुरातत्त्व विभागाच्या वतीने सुमारे एक एकरमध्ये असलेला हा पूर्ण किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली दोन एकरची मोकळी आणि अन्य जागा, असा तीन एकर समुद्रकिनारा असलेला हा परिसर आहे. या सगळय़ांचा एकत्रित विकास करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.