ऐतिहासिक पालखी शर्यतीत विट्याची पालखी प्रथम

दीडशे वर्षांची मोठी परंपरा असणारा विट्याचा ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विट्याचा श्री रेवणसिद्ध देव व मूळस्थान येथील श्री रेवणसिद्ध देव या दोन देवांच्या पालख्यांमध्ये ही शर्यत झाली. विट्याच्या पालखीने निर्णायकक्षणी आघाडी घेत शर्यत जिंकली. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक विट्यात उपस्थित होते. ‘रेवणसिद्धाच्या नावानं चांगभलं’च्या गजराने सुवर्णनगरी दुमदुमली.

विजयादशमी (दसरा) म्हणजे आनंदोत्सव. दसऱ्याला होणारी कोकणातील दशावतारी, म्हैसूरची ऐतिहासिक मिरवणूक जशी प्रसिद्ध आहे, तशीच सांगली जिल्ह्यातील विटा शहरात होणारा पालखी शर्यत सोहळा आणि विजयादशमी यांचे नाते अतूट आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत चित्तथरारक, रोमहर्षक असा हा पालखी शर्यत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

विटय़ाचा श्री रेवणसिद्ध देव व मूळस्थान येथील श्री रेवणसिद्ध देव या दोन देवांच्या पालख्यांमध्ये ही शर्यत झाली. मूळस्थान व विटा येथील दोन्ही पालख्यांची सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मारुती व विठ्ठल मंदिरासमोर आरती झाली. त्यानंतर काळेश्वर मंदिरासमोर दोन्ही पालख्या आल्या. पाहुणी असल्याने मूळस्थानच्या पालखीला पाच पावले पुढे थांबण्याचा मान प्रथेप्रमाणे दिला गेला. दोन्ही पालख्यांची काळेश्वर मंदिरासमोर पुन्हा आरती झाल्यानंतर शर्यत सोहळ्यास सुरुवात झाली. आरती झाल्यानंतर विट्याची पालखी व मूळस्थानची पालखी पळवण्यासाठी खांदेकरी कसोशीने प्रयत्न करत होते. शिलंगण मैदानाच्या वळणावरील निर्णायक क्षणी विट्याच्या पालखीने आघाडी घेत शिलंगण मैदानात प्रथम पोहोचत शर्यतीत बाजी मारली. यावेळी भाविकांनी केलेल्या ‘श्री रेवणसिद्धाच्या नावानं चांगभलं’च्या गजराने सुवर्णनगरी दुमदुमून गेली.

या पालखी शर्यत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित होते. शिलंगण मैदानात आपट्याच्या पानांचे पूजन करून सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. नागरिकांनी एकमेकांना सोने देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पालखी शर्यत मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.