पुण्यातील पोर्श कार अपघातनंतर अनेक ठिकाणी हिट अँड रनच्या दुर्दैवी घटनांचे सत्र सुरुच आहे. नागपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. दरम्यान या अपघातातील कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे.
नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्यामुळे त्याने फुटपाथ झोपलेवरल्या बंजारा परिवारातील 9 लोकांना चिरडले. जखमींमध्ये चार महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. यामधील दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान हा अपघात घडला तेव्हा कारमध्ये 5 जण होते. हे पाचही जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. भूषण लांजेवार असं आरोपीचं नाव आहे.