
भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ३ चा प्रभारी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर याच्यावर अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने झडप घातली. स्वतःच्या कारमध्ये बसून लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे भिवंडी महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुरेंद्र भोईर याची मूळ नियुक्ती सर्वेअर तथा इमारत निरीक्षक अशी होती. त्याला प्रभारी सहाय्यक आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला. प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये सुरू असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यातील पहिला अडीच लाखांचा हप्ता तात्काळ द्या असे त्याने सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली. त्यानुसार सापळा रचण्यात आला.
सायंकाळी ७ वाजता प्रभाग समिती कार्यालयाच्या बाहेर मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या स्वतःच्या कारमध्ये भोईर बसला. त्यानंतर त्याने तक्रारदाराला गाडीतून येऊन पैसे द्या असे सांगितले. अडीच लाखांची रक्कम स्वीकारताना त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने झडप घातली. रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवून त्याला अटक करण्यात आली.
पालिकेत खळबळ
गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात महापालिका कार्यालयात लाचलुचपत विभागाच्या चार धाडी पडल्या. त्यात सात कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक असतानाही तसेच अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती नंतर जबाबदारीच्या पदावर करू नये असे निर्देश असतानाही त्यांच्यावर प्रशासनाकडून मेहेरबानी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.





























































