
महाराष्ट्राने पक्षभेद बाजूला ठेवून लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीची मूठ आवळली आहे. आता मतचोरी करून निवडणूक घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्याच्या मोर्चाला मार्गदर्शन करताना दिला. मतचोरी करणाऱयांनो… आज नुसती ठिणगी बघताय. या ठिणगीचा वणवा कधीही होऊ शकेल आणि तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे, असेही त्यांनी ठणकावले.
जमलेल्या तमाम जागरूक, देशभक्त व खऱया मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशी दणदणीत सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ानंतर आज प्रथमच राजकीय पक्षांची एकजूट या मोर्चाद्वारे झाली असेल. ही नुसती विरोधी पक्षांची एकजूट नाही, तर लोकशाहीचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करणाऱया राजकीय पक्षांची एकजूट आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
…म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मतचोरी झाली हे मान्य केलेय
विरोधी पक्षांनी मतचोरीचे धडधडीत पुरावे दिले, राज ठाकरे यांनी तर आज डोंगरभर पुरावे दाखवले. रोज कुठून ना कुठून पुरावे येत आहेत तरीसुद्धा राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग काहीच करत नाही, असा संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. विरोधी पक्षांनी लोकसभेत कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलाय त्याचा पर्दाफाश करेन असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. माझे त्यांना आव्हान आहे…करूनच टाका पर्दाफाश. होऊन जाऊ दे दूध का दूध, पानी का पानी. मुख्यमंत्रीच असे म्हणतात, म्हणजे त्यांनी मतचोरी झाली हे मान्य केलेय, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.
पक्ष, निशाण्या पुरत नाहीत म्हणून सत्ताधारी मते चोरताहेत
निवडणूक आयोग सत्ताधाऱयांचा नोकर आहे. त्यांची सत्तेची भूक थांबत नाही म्हणूनच मी त्यांना अॅनाकोंडा म्हणतोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना पक्ष आणि निशाणी चोरली, वडील चोरत आहेत. ते पुरत नाही म्हणून मतदान चोरी करत आहेत. सर्व आले पण सत्ताधारी आले नाहीत, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली.
मतदार यादीतील नाव पुन्हा तपासा
महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवतो. आज पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपात एकवटलाय आणि देशाला दिशा दाखवतोय याचा मला अभिमान आहे, असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. ज्या गोष्टी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कम्युनिस्ट आणि शेकापचे कार्यकर्ते करताहेत तसे सर्व मतदारांनी आपापले नाव मतदार यादीत आहे की नाही हे पुन्हा तपासावे. घरात आपल्याला न दिसणारी, आपली परवानगी न घेतलेली माणसे राहतात की नाही हेसुद्धा तपासा, असे आवाहन त्यांनी केले. शौचालयात शंभर माणसे राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात, अशा धोक्याची जाणीवही त्यांनी करून दिली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसे आली होती. त्यांनी या अर्जाबद्दल आपल्याला विचारणा केली होती. त्यावरचा टेलिपह्न नंबरही खोटा होता. सर्वांना विचारले तर तसा अर्ज कुणीही केला नव्हता असे सांगितले. 23 -10-2025 ला सक्षम नावाच्या अॅपवरून हा अर्ज केला गेला होता. त्याबाबत आपण रीतसर तक्रार केली. याचा अर्थ माझ्या नावाने खोटय़ा नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झाला आहे. हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. कदाचित 14-15 तारखेला हा विषय हाती घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेला आहे. असे करून माझ्यासकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावे बाद करण्याचा प्रयत्न केलाय का हे आता शोधायला हवे. नक्की यात काहीतरी डाव आहे, असा संशय उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. इतके वर्षे आम्ही मतदान करतोय. एका पक्षाचा प्रमुख मी म्हणून निवडणूक प्रचार करतोय. इतक्या साध्या गोष्टी आम्हाला कळत नाहीत का, असा हल्लाही त्यांनी चढवला. निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे असे जयंत पाटील म्हणाले होते आणि विजय वडेट्टीवार यांनी तर एकाचे नावही घेतले होते, कुणाची नावे टाकायची, कुणाची नावे काढायची आणि कुणी किती वेळा मतदान करायचे, अशी पूर्ण यंत्रणा अॅपसकट भाजपच्या हातात आहे याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
मतचोर दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा
राजकीय पक्ष मतचोरीविरुद्ध लढा देत आहेत, पण हा लढा एवढय़ापुरताच मर्यादित नाही. आजपासून मतचोर जिथे दिसेल तिथे त्याला फटकवा, लोकशाही मार्गाने फटकवा, असे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मतदारांना केले. कायदा हाती घ्यायचा नाही, पण कायद्याचा दंडुका मारणार असाल तर त्या दंडुक्याचे काय करायचे याचा निर्णय घ्यायलाही महाराष्ट्रातील जनता सक्षम आहे, असा इशाराही त्यांनी सत्ताधारी भाजपला दिला.
ठाकरे कुटुंबाचे नाव मतदार यादीतून हटवण्याचा कट
संपूर्ण ठाकरे कुटुंबाचे नाव मतदार यादीतून हटवण्यासाठी मोठा कट रचला जातोय, असा खळबळजनक दावा करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याच नावाने निवडणूक आयोगाला करण्यात आलेल्या खोटय़ा अर्जाचे उदाहरण यावेळी दिले. त्या अर्जाखाली दिलेला शेरा त्यांनी वाचून दाखवला. सदर अर्जाबाबत अर्जदार यांची भेट घेऊन अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाल्याने सदर अर्ज बाद करण्यात आला आहे, असा तो शेरा होता. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ज्याने हा अर्ज केलेलाच नाही आणि आपल्या नावाने कुणी अर्ज केला हे माहितीच नाही त्याने हा अर्ज केला आहे. आता हा अर्जदार शोधायचा कुठे? ज्या अर्जदाराने हा अर्ज केलाय त्याचे नाव आहे… उद्धव बाळासाहेब ठाकरे. ते ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. उद्धव ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा ऑनलाईन अर्ज केला आहे आणि ते उद्धव ठाकरे यालाच माहीत नाही, अर्जावरचा मोबाईल नंबरही खोटा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणताच सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.
- निवडणूक होऊच देणार नाही असे शिवसेना आणि विरोधी पक्षांचे म्हणणे नाही. निवडणुका आम्हाला पाहिजेत. लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आम्ही आसुसलेले आहोतच, पण सदोष आणि चोरी करून सत्ताधारी आधीच निकाल ठरवणार असतील तर मग जनतेने ठरवावे, की निवडणुका होऊ द्यायच्या की नाहीत.
- आम्ही नेतृत्व करत आहोत जनतेसाठी. सर्व पक्षभेद, मतभेद बाजूला ठेवून देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलोय. मला काहीतरी व्हायचेय यासाठी नाही. डोळ्यादेखत लोकशाहीचा खून होतोय आणि खून करणारे दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत, त्यांच्या चरणी ‘घालीन लोटांगण’ करायला आमच्या आईवडिलांनी शिकवलेले नाही, एवढी लाचारी करणारी अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेली नाही.
संगमनेरमध्ये साडेनऊ हजार बोगस मतदार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्होटचोरी होत असल्याचे दाखवून दिले, पण यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने थातुरमातूर उत्तर दिले. त्यांनी खुलासा केला नाही. चौकशी केली नाही, तेव्हा हेही लक्षात आले की, महाराराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकाही अशाच पद्धतीवर बोगस मतदार यादीवर झाल्या आहेत. म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो. जी मतदार यादी विधानसभेच्या निवडणुकीत वापरली, ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरू नका, असे आम्ही आयोगाला सांगितले. मात्र, विधानसभेचीच मतदार यादी त्यातील कोणत्याही हरकतींवर निर्णय न घेता 1 जुलैला राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली. आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली, पण निवडणूक आयोग उत्तर देऊ शकला नाही. राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो, त्यांनीही उत्तर दिले नाही, असे ते म्हणाले.
बॅलेट पेपरवर मतदान घेऊ दिले नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद उत्तमराव जानकर यांनी यावेळी मारकडवाडी (सोलापूर जिल्हा) गावातील मतदानाच्या घोटाळ्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, निवडणुकीत मी विजयी झालो होतो, पण तरीही लोकांनी माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावात असे मतदान होऊच शकत नाही, अशा भावना व्यक्त केल्या आणि मग मारकडवाडीच्या गावाने ठरवले आपण मतपत्रिकेवर मतदान घेऊ. गावाने मतपत्रिका छापून आणल्या. मतपेट्या तयार केल्या आणि मतदानाचा दिवस उजाडला. गावात बॅनर लावले. सर्व उमेदवारांना पाचारण केले, पण त्या वेळेस पोलिसांची मोठी फौज गावात शिरली. माझ्यासह 100 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मतदान होऊ दिले नाही. आमच्या तालुक्यात मतपत्रिकेवर निवडणुका घ्या. मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे मी म्हणालो होतो. पण ना माझा राजीनामा घेतला ना त्यांनी कोणते पत्र पाठवले, असे जानकर यांनी सांगितले.
निवडणूक आयोग भाजपची शाखा झालीय
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे यांनी यावेळी निवडणूक आयोग व मोदी सरकारवर टीकास्र सोडले.निवडणूक आयोग हा भाजपची शाखा असल्याप्रमाणे काम करत आहे. मतदार यादीत घोटाळे करून लोकशाही कापून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच आयोगाच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. केंद्रातील सरकार देखील मनमानी करीत आहे. अदानीला एका रुपयात हजारो एकर जागा देणारे हे सरकार आपल्याला मतदानाचा अधिकार देऊ शकत नाहीत, असा संताप रानडे यांनी व्यक्त केला. सार्वजनिक शौचालय, औद्योगिक वसाहतीमध्ये मतदारांची नोंद आहे. एका घरात 80 माणसांची नोंद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला नमस्कार करायचा आणि त्यांचे विचार पायदळी तुडवायचे हा भाजपचा धंदा आहे. आता पुन्हा संयुक्त महाराष्ट्रासारखा लढा उभारण्याची वेळ आली आहे. आताही आम्ही बलिदानाला तयार आहोत, पण व्होटचोरी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
अॅनाकोंडाला कोंडावंच लागेल
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही शरसंधान केले. ते म्हणाले की, मध्यंतरी आपण ‘अॅनाकोंडा’ हा शब्द वापरला होता तो गाजला. ‘शोले’ सिनेमामध्ये एक डायलॉग आहे, ‘दूर गाव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है… सो जा, नही तो गब्बरसिंग आ जायेगा. तसे सर्व नागरिकांना सांगतोय, आज जागे झालात तर जागे रहा, नाहीतर अॅनाकोंडा आ जायेगा, असे उद्धव ठाकरे म्हणताच एकच हशा पिकला. या अॅनाकोंडा डाला आता कोंडावेच लागेल, नाहीतर हे सुधारणार नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मतचोरीचे पुरावे घेऊन न्यायालयात जाणार
मतचोरीचे सर्व पुरावे घेऊन येत्या काही दिवसात न्यायालयात जाणार, अशी घोषणाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. आम्ही प्रामाणिकपणे कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोत. आता न्यायालयात कधी न्याय मिळणार याचीही परीक्षा होईल. निवडणूक आयोग लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस सर्वोच्च न्यायालयात तीन-चार वर्षे सुरूच आहे. आता मात्र सर्व साक्षी-पुरावे दिल्यानंतर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी खात्री आहेच, नाहीतर जनतेचे न्यायालय मतचोरांचे काय करायचे याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे, असेही त्यांनी बजावले.
महाराष्ट्राने आवळलेल्या मुठीचे फोटो मतचोरांच्या बादशहाकडे पाठवा
मराठी माणूस, हिंदू आणि महाराष्ट्रासाठी आम्ही ठाकरे बंधू एकत्र आलोय. अशावेळी आम्ही पुढे जात असताना भक्कमपणे साथ देणे हे जनतेचे कर्तव्य आहे. साथ देण्याची धमक असेल तर दोन्ही हातांच्या मुठी आवळून दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित लाखोंच्या गर्दीला करताच सर्वांनी मुठी आवळून दोन्ही हात वर केले. महाराष्ट्राने एकजुटीची मूठ आवळली हे बघण्यासाठी फोटोग्राफरनी तो फोटो मतचोरांच्या बादशहाकडे पाठवून द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शरद पवार यांचे एकजुटीचे आवाहन
लोकसभेनंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालामुळे सामान्य माणसाच्या मनातील संसदीय लोकशाहीला धक्का बसला आहे. याबाबत वारंवार आवाज उठवूनही निवडणूक आयोगाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे मतचोरी थांबवून लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला आणि मला एक व्हायलाच हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.
आजचा हा मोर्चा जुन्या गोष्टींची आठवण करून देणारा आहे. महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी असे मोर्चे निघायचे. तुम्ही सगळय़ांनी जी जबरदस्त एकजूट दाखविली त्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण आली असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील निकालामुळे अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. सत्तेचा गैरवापर सातत्याने होत आहे. या सगळय़ाला आता एकजुटीने तोंड देण्याची वेळ आली आहे, असे शरद पवार म्हणाले. आपल्यामध्ये राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकांमध्ये संघर्षही होत असतात, पण या सर्व गोष्टी विसरून आता आपल्याला एक व्हावं लागेल. लोकशाहीने आपल्याला जो अधिकार दिला आहे, तो जतन करावा लागेल आणि त्यादृष्टीने पुढील वाटचाल करावी लागेल, असेही आवाहनही त्यांनी केले.
सरकारचे गैरप्रकारांना समर्थन
– निवडणुकीत मतचोरी होते. बनावट आधार कार्ड बनवून मिळतात. याबाबत अनेक तक्रारी येतात, मात्र कारवाई होत नाही. उलट पुराव्यानिशी आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. म्हणजेच या सर्व गैरप्रकारांना सरकार समर्थन देत आहे. त्यामुळे मतचोरी थांबवून लोकशाही टिकवण्यासाठी व्यासपीठावर सर्व लोक एकत्र आले आहेत, असेही पवार म्हणाले.


























































