
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
दिवाळी निमित्त पुढील आठवडाभर सुट्ट्या असल्याने 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत सिंधुदुर्गनगरी मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांची दिवाळी आल्यासारखे आहे. यामुळे शासकीय अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण असून पुढील संपूर्ण आठवडा सिंधुदुर्गनगरीसह शासकीय कार्यालयांत शुकशुकाट राहणार आहे.
या वर्षीची दिवाळी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष आनंददायी ठरली आहे. कारण या दिवाळीत खास सुट्टी घेण्याची आवश्यकता भासणार नाही. सोमवार 5 नोव्हेंबर ह्या एकादिवशी कार्यालयात आल्यानंतर पुन्हा थेट 12 तारखेला पुढच्या सोमवारीच कार्यालयांत यायचे आहे. बाकीचे सर्व म्हणजेच 6 ते 11 नोव्हेंबर हे सुट्टीचेच दिवस आहेत. 6 नोव्हेंबर या दिवशी नरक चतुर्थी असून या पहिल्या आंघोळीच्या दिवशी जाहीर सुट्टी आहे. तर 7 व 8 रोजी लक्ष्मी पूजन आणि पाडवा या सणांची सुट्टी आहे. तर 9 रोजी भाउबीज हा सण असल्याने या दिवशी राज्य शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. आणि 10 तारीख हा दुसरा शनिवार असल्याने त्यादिवशी आणि 11 तारखेला रविवार यामुळे सलग आठ दिवस ही सुट्टी मिळाली आहे.
या सुट्टीमधे सर्व शासकीय कार्यालयांसह न्यायालयेही बंद राहणार आहेत.
































































