देश विदेश – सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. सोने साडे तीन हजार रुपयांनी वाढून प्रति तोळा 1 लाख 59 हजार 394 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीमध्ये तब्बल 15 हजारांहून अधिक वाढ झाल्याने चांदी प्रति किलो 2 लाख 65 हजार 653 रुपये झाली आहे. 2026 मध्ये सोने 25 हजार रुपयांनी तर चांदी 35 हजार रुपयांनी महाग झाली आहे. 29 जानेवारी रोजी सोने 1 लाख 76 हजार रुपये प्रति तोळा तर चांदी 3 लाख 86 हजार रुपये किलोच्या सर्वोच्च उच्चांकावर पोहोचली होती. येत्या काही दिवसांत सोने-चांदी आणखी महाग होण्याची शक्यता आहे.

 मुंबईकरांची आयआरसीटीसी पॅकेजला पसंती

मुंबईकरांनी 2025-26 या आर्थिक वर्षात आयआरसीटीसीच्या पर्यटन पॅकेजला पसंती दर्शवली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण 1442 प्रवाशांनी आयआरसीटीसी टूर पॅकेज बुक केले. यात 1006 प्रवाशांनी देशांतर्गत तर 436 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय पॅकेजला प्राधान्य दिले. यातून आयआरसीटीसीला एकूण उत्पन्न 2.27 कोटी रुपये मिळाले आहेत. देशांतर्गत टूरिज्ममध्ये अंदमान आणि दक्षिण भारत सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण ठरले. नेपाळ, श्रीलंकेलाही चांगली मागणी आहे. आगामी काळात सीझनमध्ये आणखी मागणी वाढेल, असा आयआरसीटीसीला अंदाज आहे.

 किम जोंग उन पुन्हा महासचिवपदी

उत्तर कोरियाचे नेते आणि हुकूमशहा असलेले किम जोंग उन यांची पुन्हा एकदा सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अण्वस्त्र आणखी मजबूत करणे आणि क्षेत्रीय प्रभाव वाढवण्याचे संपूर्ण श्रेय हे किम जोंग यांना जाते. उत्तर कोरियाकडे आधीपासूनच मिसाईल आहे. हजारो प्रतिनिधींनी एकमतांनी किम यांना पक्षाचे महासचिवपदी निवड केली आहे. 2016 पासून दर पाच वर्षांनी या पदासाठी निवड केली जाते, असे उत्तर कोरियाचे अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले.

 बुलेट ट्रेनसाठी जपानमध्ये पायलटचे प्रशिक्षण

मुंबईअहमदाबाद बुलेट ट्रेन चालवण्यासाठी 15 हिंदुस्थानी पायलट जपानमध्ये विशेष प्रशिक्षण घेत आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका हिंदुस्थानी लोको पायलटला जपानी प्रशिक्षक ट्रेन कशी चालवायची याचे प्रशिक्षण देत आहे. हिंदुस्थानच्या 15 लोको पायलटची निवड ही मेट्रो आणि रेल्वे लोको पायलटच्या अनुभवावरून करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी आणि जेआर ईस्ट यांच्या सहकार्यातून केले जात आहे.