अबब! आता मधमाश्या करणार कोरोना तपासणी, वैज्ञानिकांचा दावा

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सर्वत्र सुरू आहे. कोरोनाचे सावट दूर करण्याकरिता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तसेच कोरोना तपासणी केल्यानंतर रिपोर्ट मिळेपर्यंत पाच ते सात दिवस वाटही बघावी लागते. याकरिता नेदरलॅंडमधील काही संशोधकांनी रुग्णाची कोरोना चाचणी करण्यासाठी चक्क मधमाश्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. हा सर्वात स्वस्त पर्याय असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

या प्रयोगात सहभागी असलेले प्राध्यापक विम वॅन डेर पोएल यांनी सांगितले की, एका मधमाशी पालकाकडून आम्ही काही मधमाश्या घेतल्या. मधमाशा कोरोना विषाणुला त्याच्या वासावरून शोधू शकतात. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या समोर येताच मधमाश्या आपली जीभ बाहेर काढतात. यावरून तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे हे ओळखता येतं.

रुग्ण निगेटिव्ह असल्यास त्या आपली जीभ बाहेर काढत नाहीत. याकरिता 150 मधमाश्यांना पॉवलोवियन कंडिशनिंग या पद्धतीने प्रशिक्षित करण्यात आलं आहे. या प्रशिक्षणात कोरोना विषाणुला मधमाश्या वासावरून शोधू शकतात. यासाठी मधमाश्यांना कोरोना विषाणुचा वास कळण्याकरिता साखरेचे गोड पाणी देण्यात आले. मधमाश्यांना कोरोना रुग्ण जवळ गेल्यावर विषाणुचा वास आल्यावर पाणी मिळालं नाही तर त्यांना जीभ बाहेर काढण्याची सवय लागली. तसेच कोरोना निगेटिव्ह रुग्ण असल्यास त्या जीभ बाहेर काढत नाहीत.

ज्या देशांचे उत्पन्न कमी आहे अशा देशातील नागरिकांची कोरोना तपासणी करण्याकरिता मधमाश्यांचा पर्याय स्वस्त ठरू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे असले तरीही कोरोना टेस्टिंग किटची जागा मधमाश्यांच्या उपाय पद्धतीमुळे भरून निघू शकत नाही, असे बऱ्याच संशोधकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही 1990 साली अमेरिकेने स्फोटकांतील विष ओळखण्याकरिता किटकांची मदत घेतली होती, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या