टिटवाळ्यात ‘ऑनर किलिंग’, तरुणीची नराधम बापानेच केली हत्या!

4703

कल्याण स्थानकाबाहेर आढळलेल्या सुटकेस डेडबॉडीचा पोलिसांनी अवघ्या 30 तासांत छडा लावला आहे. मुलीचे आंतरजातीय प्रेम प्रकरण मंजूर नसल्याने खुद्द जन्मदात्या बापानेच या 22 वर्षीय मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाने टिटवाळा हादरून गेला. मुलगी प्रिन्सीच्या शरीराचे दोन तुकडे केल्याची कबुली नराधम अरविंद तिवारी (47) याने दिली असून उत्तर प्रदेशमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मालाड येथून त्याच्या मुसक्या आकळल्या.

रविवारी पहाटे मुंडके छाटलेला आणि कमरेखालचा भाग कल्याण स्टेशनबाहेर आढळल्याने सर्वजण हादरले होते. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे या हत्याकांडाचा तपास दिला होता. यासाठी चार पथके तयार केली होती. फक्त कमरेखालचा भाग असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. दरम्यान, कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर कैद झाल्यामुळे पोलिसांनी त्या आधारे कसून शोध सुरू केला आणि आज दुपारी 12 वाजता आरोपी तिवारीच्या मुसक्या आवळल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, संजू जॉन यांच्या पथकाने ही कारकाई केली.

टिटवाळा कनेक्शन खरे ठरले
मृतदेह बॅगेत भरून घेऊन येणारी व्यक्ती कल्याण रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. काळी बॅग घेऊन तोंडाला टॉवेल गुंडाळून मारेकरी फलाट क्रमांक एकवर उतरून स्टेशनच्या बाहेर पडताना फुटेजमध्ये दिसले. यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरली. कल्याणमध्ये ज्या लोकलमधून तो उतरला ती लोकल टिटवाळा येथून सुटली होती. त्यामुळे पोलिसांनी कल्याण ते टिटवाळा या तीन स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी अरविंद तिवारी टिटवाळा स्थानकात चढल्याचे फुटेजमध्ये आढळून आले. लागलीच पोलिसांनी फुटेजमधील फोटोच्या आधारे टिटवाळा पिंजून काढला. इंदिरानगरमधील साईनाथनगर चाळीत तिवारी राहत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रात्री पोलीस त्याच्या रूमवर धडकले. पोलिसांनी कंपनीतील कामगारांकडून अधिक माहिती घेतली असता तो मूळ गावी उत्तर प्रदेशला जाणार असल्याची माहिती मिळाली. याआधारे मालाड येथील एका ठिकाणाहून त्याला अटक केली.

पत्नी, दोन मुली आहेत कुठे?
अरविंद तिवारीला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी अद्याप मृतदेहाचा कमरेवरील भाग हस्तगत झालेला नाही. तिवारीने अद्याप मृतदेहाच्या उर्वरित भागाची विल्हेवाट कुठे लावली हे सांगितलेले नाही. तो तपासात सहकार्य करत नसल्याचे समजते. याशिवाय मुलीची हत्या केली त्यावेळी पत्नी आणि दोन मुली घरात होत्या की नाही हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. हत्याकांडानंतर तिवारीची पत्नी आणि दोन मुली गायब आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे.

समाज वाळीत टाकेल याची भीती
प्रिन्सीचे दोन वर्षांपासून परिसरातील अन्य धर्मातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. अरविंद तिवारीचा या प्रेमप्रकरणाला टोकाचा विरोध होता. तू जर आंतरजातीय विवाह केलास तर गावी आम्ही तोंड कसे दाखवायचे? समाजाने वाळीत टाकले तर तुझ्या दोन बहिणींची लग्ने कशी व्हायची, असे तिवारी वारंवार मुलीला बजावायचा. मात्र प्रिन्सी आपल्या मतावर ठाम होती. प्रिन्सी ऐकत नाही म्हटल्यावर संतापातून बापानेच मुलीला संपकून टाकले.

आठवडय़ातील तिसरी घटना,पनवेलमध्येही बॅगेत सापडला मृतदेह
मुंबईपाठोपाठ कल्याणमध्ये रविवारी बॅगेत कोंबलेले दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असतानाच आता पनवेलमध्येही अशी घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील हरिग्राम ते पनवेल मार्गावरील गाढी नदीच्या पात्राजवळ एका काळसर रंगाच्या रेग्झिन बॅगेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या