राजापूर रानतळे येथे मोकाट गुरांमुळे भीषण अपघात; वाहनचालक थोडक्यात बचावला

राजापूर तालुक्यातील रानतळे येथील पोल्ट्रीफार्मजवळ सोमवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मोकाट गुरांमुळे भीषण अपघात झाला. बारसू येथील युवा ठेकेदार दीप्तेश कदम यांच्या चारचाकी वाहनाला रस्त्यावर आलेल्या गुरांमुळे जोरदार धडक बसली. या धडकेनंतर गाडी उलटून रस्त्याच्या कडेला गेली. सुदैवाने या दुर्घटनेतून वाहनचालक थोडक्यात बचावला आहे. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांनी सीटबेल्टचा वापर केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या अपघातात एक म्हैस जागीच ठार झाली असून दुसरे जनावर गंभीर जखमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा प्रश्न सातत्याने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. तरीदेखील ठोस कारवाई न झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोकाट गुरांचे मालक शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अपघातातून बचावलेल्या वाहनचालकावर कोणतीही गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.