
निसर्गरम्य माथेरानमधील दस्तुरी नाका ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यादरम्यानच्या ट्रेकिंग व अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक टाकू नयेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तरीही प्रशासनाने काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवले असून त्यामुळे घोड्यांना इजा होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन उद्या सोमवारी अश्वपाल संघटनेच्या वतीने ‘घोडेबंद’ आंदोलन करण्यात येणार आहे.
पेव्हर ब्लॉक बसवल्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर निसरडेपणा निर्माण होतो. त्यामुळे पाय घसरून अपघात होण्याचाही धोका आहे. कोणत्याही परिस्थितीत पेव्हर ब्लॉक बसवू नये, अशी मागणी अश्वपाल संघटनेने प्रशासनाकडे अनेकदा केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर उद्या या संघटनेने घोडेबंद ठेवून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
ई-रिक्षांचाही बंद
माथेरानमधील सर्व ९४ हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. त्याविरोधात ई-रिक्षा संघटनेने उद्या सोमवारी पुन्हा ई-रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माथेरानमध्ये उद्या येणाऱ्या पर्यटकांना ना घोडे मिळणार ना ई-रिक्षा. त्यामुळे त्यांच्यासह स्थानिकांचेही हाल होणार आहेत.

























































