हॉटेल्स, रिसॉर्टस्, होम स्टे पूर्ण क्षमतेने सुरू, पर्यटन विभागाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी ऍण्ड बी (बेड ऍण्ड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आता 100 टक्के सुरू करता येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग, पर्यटकांचे स्कॅनिंग, सॅनिटायझेशन अशा उपाययोजना करून सर्व हॉटेल्स-रिसॉर्टस सुरू करता येणार आहेत. याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) https://www. maharashtratourism.gov.in/ वेबसाइटवर देण्यात आली आहेत.

– हॉटेल्स, रिसॉर्टस् यांनी प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गन आदींसारख्या साहित्यामार्फत तपासणी करावी. फक्त लक्षणे नसलेल्या पर्यटक तथा प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा.
– सेवा देताना तसेच वेटिंग रूम आदी सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
– प्रवाशांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व आवश्यक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायजर ठेवण्यात यावा. डिजिटल माध्यमातून चलनाची देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन द्यावे.
– हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहणाऱया पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱया वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता करण्यात यावी.
– पर्यटकांची ट्रव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आदीबाबतची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-इन करण्यापूर्वी शक्यतो ऑनलाइन भरून घेण्यात यावा. शक्य असल्यास क्यूआर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-इनसारख्या बाबी सुरू कराव्यात.
– अभ्यागतांनी शक्य असल्यास त्यांच्या सामानाची स्वतः ने-आण करावी. एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास अभ्यागतांचा समोरासमोर संपर्क टाळण्याच्या दृष्टीने वर जाणे आणि खाली येण्यासाठी वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करण्यात यावा.
– रूम सर्व्हिस संपर्करहित असावी. अभ्यांगताने मागवलेली ऑर्डर रूमच्या बाहेर ठेवण्यात यावी. मुलांसाठीचे प्ले एरिया बंद राहतील. याशिवाय इतरही विविध मार्गदर्शक बाबींचा एसओपीमध्ये समावेश करण्यात आला आहे.