
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण शहरातील धुरीवाडा किनारपट्टीवरील कुरण येथील चंद्रकांत भिकाजी जोशी यांच्या झोपडी वजा झावळाच्या घरास शनिवारी रात्री साडे सात वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत घरातील भांडी, अन्नधान्य, घराची महत्त्वाची कागदपत्रे व अन्य साहित्य जळून खाक झाले. यात जोशी यांचे सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
या घरात जोशी, पत्नी, मुलगा, सासरे व त्यांचा भाऊ असे चार ते पाचजण राहतात. सायंकाळी अचानक आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. प्रथम नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पालिकेस देत अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला. मात्र घर वस्तीच्या मधोमध असल्याने हा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचू शकला नाही. त्यामुळे स्थानिक व धुरीवाडा येथील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीत घर बेचिराख झाले. घरातील अन्य साहित्यासह महत्त्वाची जळून खाक झाल्याने जोशी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
























































