
राजकुमार भगत । न्हावाशेवा
विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शुक्रवार 28 रोजी चिरनेर येथे एक घर जळाले. या घराला लागलेल्या आगित घर आणि घरातील सामानसुमान जळून खाक झाले. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात एकूण 17 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवित हानी झाली नाही.
रात्री 9 वाजण्याच्या सुमारास या घरावर वीज पडली आणि घराला आग लागली. संजय परशुराम पाटील यांच्या या मालकीच्या घरातील मंडळी त्या दरम्यान बाहेर गणपतीच्या दर्शनासाठी गेले असल्यामुळे मोठी जीवित हानी झाली नाही. आगीत घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू टिव्ही, फ्रीज, कपाट, कपाटातील दागिने, घरातील अन्नधान्य, भांडी आणि कागदपत्रे जळून खाक झाली. चिरनेर गावातील ग्रामस्थांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घरातील सर्व वस्तूंचा कोळसा झाला होता. आगीची तीव्रता एवढी होती की, घरातील भांडी, पंखे आणि कपाट वितळून गेले. कपाटातील दागिने आणि रोख रक्कम 1 लाख 50 हजारही जळाले. चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर, पोलीस पाटील संजय पाटील, तलाठी यांनी रात्री उशिरा पर्यंत घराचा पंचनामा केला. यावेळी 17 लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. शनिवार 29 रोजी उरणच्या तहसिलदार कल्पना गोडे यांनी घटनास्थळी येवून पहाणी केली आणि नैसर्गिक आपत्ती म्हणून या कुटूंबाला मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.






























































