
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने एआयचा वापर करून आपले घर सुमारे 1 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 9.5 कोटी रुपयांमध्ये विकले आहे. मियामीचे रहिवासी रॉबर्ट लेविन यांनी घर विकण्यासाठी कोणत्याही रिअल इस्टेट एजंटची मदत घेतली नाही, तर चॅटजीपीटीला आपला मार्गदर्शक बनवले. लेविन यांनी केवळ 5 दिवसांतच व्यवहार पूर्ण केला. विशेष म्हणजे, स्थानिक एजंट्सनी सांगितलेल्या किमतीपेक्षा एआयच्या सल्ल्यामुळे 95 लाख रुपये अधिक मिळाले.
रॉबर्ट लेविन यांनी घराची योग्य किंमत ठरवण्यासाठी, लिस्टिंग तयार करण्यासाठी आणि मार्पेटिंग मजकूर लिहिण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला. लेविन यांनी सांगितले की, त्यांनी प्रत्येक लहान-मोठय़ा निर्णयासाठी या टूलवर विश्वास ठेवला. चॅटजीपीटीने लेविनला केवळ मजकूर लिहून दिला नाही, तर घर बाजारात आणण्याची सर्वात योग्य वेळ कोणती आहे हेदेखील सांगितले. टूलने त्यांना घरात काही छोटे बदल करण्याचादेखील सल्ला दिला, ज्यामुळे प्रॉपर्टीची किंमत वाढू शकेल.
घर विक्रीसाठी बाजारात लिस्ट केल्याच्या अवघ्या तीन दिवसांच्या आत लेविनला 5 खरेदीदारांच्या ऑफर मिळाल्या. त्यांनी घर 1 दशलक्ष डॉलरमध्ये विकले. ही किंमत रिअल इस्टेट एजंट्सनी दिलेल्या अंदाजानुसार सुमारे 1,00,000 डॉलरने जास्त होती.
लाखो रुपयांचे कमिशन वाचले
लेविन म्हणाले की, एआयच्या वापरामुळे त्यांनी एजंटला द्यावे लागणारे कमिशन वाचवले. मात्र त्यांनी खबरदारी म्हणून कागदपत्रांच्या
कामासाठी एका वकिलाची मदत नक्की घेतली. लेविन यांचे मत आहे की, एआय पूर्णपणे व्यावसायिकांची जागा घेऊ शकत नाही, पण ते काम खूप सोपे आणि किफायतशीर बनवते.






























































