
ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी अनेक देशांचे खेळाडू वर्षानुवर्षे करतात. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होणे, ही फार मोठी गोष्ट असते. ऑलिम्पिक स्पर्धेत कोणतेही पदक जिंकले तर त्या खेळाडूचे नाव इतिहासात जमा होते.
ऑलिम्पिकमध्ये जगभरातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ सहभागी होतात. दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीन पदके दिली जातात.
1912 मध्ये स्टॉकहोम येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटची ‘शुद्ध’ सोन्याची पदके विजेत्या खेळाडूंना देण्यात आली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) आखून दिलेल्या नियमांनुसारच पदकांची निर्मिती केली जाते.
सुवर्णपदक
ऑलिम्पिकमध्ये जो खेळाडू सुवर्णपदक जिंकतो त्या सुवर्ण पदकाचे वजन 556 ग्रॅम असते. पदकाच्या पृष्ठभागावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो.
रौप्य पदक
रौप्य पदकाचे वजन 550 ग्रॅम असते. या पदकात शुद्ध चांदीचा वापर करण्यात आलेला असतो.
कांस्य पदक
कांस्यपदकाचे वजन 450 ग्रॅम असते. या पदकात तांबे 428 ग्रॅम तर जस्त 22 ग्रॅम एवढे असते.
यावर्षी टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये देण्यात आलेले सुवर्णपदक खास आणि संस्मरणीय आहेत. जपानी लोकांनी जमा केलेली जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वितळवून त्यातून निघालेल्या धातूंचा वापर या पदकांमध्ये करण्यात आला आहे. तेथील लोकांनी यासाठी 62 हजार जुने मोबाइल फोन दिले आहेत. याशिवाय 32 किलो सोने देखील जमा केले आहे.
परंतु आपण कधी विचार केला आहे का की, एखाद्या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेल्या एका सुवर्णपदकाची किंमत किती असते?
सर्वांना हेच वाटत असेल की संबंधित खेळाडूस मिळणाऱ्या एका सुवर्णपदकाचे मूल्य अंदाजे 26 लाख 29 हजार 880 रुपये होईल. परंतु तसे बिल्कुल नाही. समजा खेळाडूने हे पदक विकले तर त्याला त्याचे फक्त 65 हजार 790 रुपये मिळतील.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की असे का? जर सुवर्णपदकाचे वजन 556 ग्रॅम आहे तर त्याची किंमत इतकी कमी कशी? चला तर बघू.
सुवर्णपदकाचे एकूण वजन 556 ग्रॅम असते. परंतु त्यात सोने केवळ 6 ग्रॅम असल्यामुळे सोन्याची किंमत झाली 28 हजार 500 रुपये. यामध्ये असलेल्या 550 ग्रॅम चांदीची किंमत झाली 37 हजार 290 रुपये. म्हणजेच सुवर्णपदकाची एकूण किंमत 65 हजार 790 रुपये इतकी होईल.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी खेळाडू आपली जिद्द, मेहनत व आत्मविश्वास पणाला लावतात. खेळामध्ये सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य यांपैकी कोणतेही पदक मिळवणं हे खेळाडूसाठीच नव्हे तर देशासाठीही अभिमानाचं असतं.
पदकामध्ये धातूचे / सोन्याचे प्रमाण किती आहे किंवा त्याची किंमत किती आहे, यावरून त्या पदकाचे महत्त्व/मूल्य जराही कमी होत नाही. उलटपक्षी ऑलिम्पिक स्पर्धेत ‘सर्वोत्तम प्रदर्शन’ करून पदक प्राप्त केल्यामुळे विजेता खेळाडू व संबंधित देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जातो, हे जास्त महत्त्वाचे आहे.
टीप- सदर उत्तरातून केवळ माहिती व थोडक्यात वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कुठलाही खेळाडू, क्रीडाप्रेमी, कुठलीही व्यक्ती, संस्था किंवा एखाद्या देशाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.
कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना सतीश राजगुरे यांनी ही माहिती दिली.


























































