
सामना ऑनलाईन । गाझियाबाद
एका नावाजलेल्या कार कंपनीत एचआर एक्सिक्युटिव्ह पदावर असलेल्या तरुणाची नोकरी गेल्यानंतर त्याने एक टोळी बनविली आणि तो त्यांचा म्होरक्या बनला. ही टोळी लूटमार करण्यासह सोनसाखळी चोरीसारख्या घटनांमध्ये सहभागी होती. पोलिसांनी या गँगलीडरसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी 6 मोबाईल, 3 चाकू आणि 38 हजाराची रोकड जप्त केली आहे. या टोळीतील दोनजण उच्चशिक्षित असल्याची माहिती पोलिसांना दिली. पवन, अनुराग तिवारी, विवेक आणि प्रशांत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
टोळीतील एकाने एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. तर दुसऱ्याने डीडीएम करून स्वत:चे डेंटल क्लिनिक सुरू केले होते. पवन आणि अनुराग हे दोघे टोळीचे म्होरके होते. तपासात त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांबाबतही माहिती दिली. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लूटमार करून मिळालेल्या पैशांचा उपयोग ते शॉपिंगसाठी करत होते. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या पैशातून ते पार्टी करत होते, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. गाझियाबादमध्ये 28 ऑगस्ट, 1 आणि 14 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात लूटमार केली होती. तसेच ४० पेक्षा जास्त ठिकाणी लूटमार आणि सोनसाखळी चोरी केल्याची कबूलीही त्यांनी दिली आहे.
महागडे शौक पूर्ण करण्यासाठी बनले गँगस्टर
या टोळीचा म्होरक्या आणि मास्टरमाइंड अनुराग तिवारीने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. तो एका नावाजलेल्या कार कंपनीत एचआर एक्सिक्युटिव्ह पदावर काम करत होता. तसेच कार्यालयाच्या अॅडमिनची जबाबदारीही सांभाळत होता. नोव्हेंबर 2017 मध्ये नोकरी गेल्यानंतर त्याला दुसरी चांगली नोकरी मिळाली नाही. ‘मोकळ्या मनी सैतानाचा वास’ या म्हणीप्रमाणे त्याच्या डोक्यात टोळी बनवण्याचा विचार आला. त्यातच त्याची ओळख डेंटल क्लिनिक चालवणाऱ्या पवनशी झाली. पवनचे डेंटल क्लिनिकही फारसे चालत नव्हते. त्यामुळे दोघांनी टोळी बनवून लूटमार आणि सोनसाखळी चोरी करायला सुरुवात केली. आपले महागडे शौक पूर्ण करण्यासाठी ते गँगस्टर बनल्याचे पोलिसांनी सांगितले.



























































