JEE आधी की प्रॅक्टिकल परीक्षा? बारावीचे विद्यार्थी संभ्रमात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारावी सायन्स शाखेचे विद्यार्थी सध्या संभ्रमात पडले असून जेईई मेन्स आधी की प्रॅक्टिकल परीक्षा, असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे. या दोन्ही परीक्षा एकाच वेळी येत असल्याने अभ्यासाचे नियोजन कसे करायचे याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.

जेईई मेन्स परीक्षेचे सेशन 4 हे 24 ते 28 मे दरम्यान होणार असून बारावीची लेखी परीक्षा 21 मे रोजी संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या दोन्ही परीक्षा एकाच वेळी येत असल्याची तक्रार बारावीच्या विद्यार्थ्यांनी केली असून जेईई परीक्षा पार पडल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षेचे आयोजन करावे, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. या वेळी अन्य मागण्यांचे एक निवेदनही शिक्षणमंत्र्यांना देण्यात आल्याचे ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशनच्या अॅड. अनुभा सहाय यांनी सांगितले.

दहावीप्रमाणे बारावीसाठीही बेस्ट ऑफ फाईव्ह आणा

दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही बेस्ट ऑफ फाईव्ह हे सूत्र अमलात आणा, अशी मागणी ऑल इंडिया पॅरेंटस् असोसिएशनने शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. बारावीचे गुण ग्राह्य धरताना जास्तीत जास्त गुण मिळालेले पाच विषय ग्राह्य धरण्यात यावेत, असे विद्यार्थी, पालकांचे म्हणणे आहे. तसेच कॉमर्स आणि बायपह्कल शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नमुना प्रश्नावली जाहीर करण्यात यावी, 50-50 गुणांचे अंतर्गत आणि बहिर्गत मूल्यमापन करण्यात यावे, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

जेईई आणि बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा एकाच वेळी येणार नाहीत

बारावी सायन्स शाखेचा विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर बायोलॉजीचा असून तो 11 मे रोजी होणार आहे. त्यानंतर पार पडणाऱया परीक्षेला बसणाऱया बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल परीक्षा आणि जेईई परीक्षा एकत्र येतील असे घडण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बारावीच्या शिक्षकांनी स्पष्ट केले.