HSC RESULTकोशिश करने वालों की कभी हार नही होती… भाईंदरमधील 76 वर्षांचे आजोबा झाले बारावी पास

>> मनीष म्हात्रे

शिक्षणाला वयाचे बंधन नसते. फक्त इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर यशाचे शिखर गाठायला वेळ लागत नाही. भाईंदरमध्ये राहणारे 76 वर्षीय आजोबा गोरखनाथ मोरे यांनी हे स्वतः सिद्ध करून दाखवले आहे. नेव्हीतून निवृत्त झालेल्या या जवानाने ‘हम भी कुछ कम नही’ असे म्हणत 12 वी कला शाखेची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आज निकाल समजला आणि मोरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा आनंदही गगनात मावेनासा झाला. त्यांना 45 टक्के गुण मिळाले असून वकील होण्याची आपली मनीषा असल्याचे त्यांनी सांगितले.

मूळचे जळगाव जिह्याचे रहिवासी असलेले गोरखनाथ मोरे यांचा जन्म 1947 चा. नेव्हीत त्यांना तरुणपणी नोकरी लागली आणि ते मुंबईतील कुलाबा येथे राहायला आले. त्यांचे शिक्षण 11 वीपर्यंतच झाले होते. 32 वर्षे नेव्हीतील नोकरी तसेच संसाराचा गाडा यामुळे इच्छा असूनही मोरे यांना पुढील शिक्षण घेता आले नाही, पण शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. नेव्हीतील प्रदीर्घ नोकरीनंतर ते भाईंदरमध्ये राहायला आले. त्यांचा एक मुलगा नितेश हादेखील नेव्हीमध्येच चांगल्या पदावर काम करीत असून मुलगी आरती दातांची डॉक्टर आहे.

नायगाव येथील मुलीच्या दवाखान्यात गेल्या वर्षी ऋषी वाल्मिकी कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक रवी भाटकर हे दातांच्या उपचारासाठी आले होते. त्यावेळी सहजपणे बोलताना आरती यांनी सांगितले की, माझ्या वडिलांना पुढील शिक्षण घ्यायचे आहे. कला शाखेतून बारावीची परीक्षा देण्याची त्यांची इच्छा व जिद्द आहे. त्यावर रवी भाटकर यांनी मदतीचा हात पुढे केला. गोरखनाथ मोरे यांच्या मुलीने लगेच त्यांच्याकडे अकरावीची कागदपत्रेदेखील सुपूर्द केली. ही सर्व माहिती व अर्ज भाटकर यांनी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात एचएससी बोर्डाकडे पाठवून दिली. आश्चर्य म्हणजे, बोर्डाने मोरे यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.

 मोरे यांनी ‘विद्यार्थी’ बनून 76 व्या वर्षी नव्या जिद्दीने बारावी कला शाखेचा अभ्यास सुरू केला. वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ते परीक्षेला बसले आणि आज 45 टक्के गुण मिळवून पास झाल्याची आनंदवार्ता त्यांच्या कानावर पोहोचताच ‘कोशिश करने वालों की कभी हार नही होती’ या ओळीदेखील जिवंत झाल्या.