कोलकातामधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात आंदोलने सुरू आहेत. या प्रकरणाबाबात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोलकताची घटना ताजी असताना आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रमोशन देण्याच्या बहाण्याने महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश दाभाडे हे मेटल अँड पेपर मार्केट आणि शॉप माथाडी कामगार बोर्डाचे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून कार्यरत आहेत, अशी माहिती पायधुनी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिनेश दाभाडे यांनी त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले. आधी तिला प्रमोशन देण्याच्या बहाण्याने आपल्या केबिनमध्ये बोलावले. मग दिनेश दाभाडे यांनी महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तिचा हात धरला, तिच्या पाठीवरून हात फिरवला. हा सगळा प्रकार महिलेच्या वेळीच लक्षात आल्याने ती तेथून निसटली, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, महिलेने या प्रकाराबाबत पायधुनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी दाभाडे यांना नोटीस बजावली असून याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.