
> क्षिती जोग
सक्तीची सुट्टी बरेच काही शिकवून गेली… आवडीच्या सगळय़ा गोष्टी तर केल्याच पण या सगळय़ात घरी काम करणाऱया मावशींचे, वाहनचालकाचे काम किती महत्त्वाचे असते ते समजले.
स्टार वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहेलाता है’ याचे शूटिंग सुरू आहे. त्याचे रोज शूटिंग असतं. शूटिंगला जाताना मी माझी पुरेपूर काळजी घेऊन जाते. पूर्वी डबा घेऊन जायचे. पण एखादं दिवस बाहेर खाणं व्हायचं. पण आता नियमित घरचा डबा आणि पाण्याची बाटली घेऊन जाते. मला कॉफी लागते म्हणून तीही घरून बनवून घेऊन जाते. माझी शूटिंगला जातानाची तयारी खूप वाढली आहे. पूर्वी एक बॅग उचलून घेऊन जायचे पण आता तसे नाही. आता बऱयाच आवश्यक गोष्टी बॅगेत असतात. दोन मास्क सोबत ठेवते. दिवसभर बारा तास मास्क लावायचे असते म्हणून दुसरा मास्क सोबत ठेवते. मोठा सॅनिटायझर स्प्रे घेऊन जाते. सेटवर आमची खूप काळजी घेतली जाते पण असं करूनही आमच्या सेटवर मध्ये चार कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. आपली लहानशी चूकही आपल्याला महागात पडू शकते आणि इतरांनाही त्याचा धोका होऊ शकतो. पण आपण आणखी किती काळजी घेणार आहोत. तरीही आपल्या परीने मी शक्य तेवढी काळजी घेते. सकाळी शूटिंगला येताना गरम पाणी आणि हळद पिऊन येते. आता आयक्रीम खाण्याचे धाडसंही होत नाही. कामासाठी बाहेर जाते, खूप लोकांमध्ये एक्स्पोज होतेय पण माझ्या घरी हेमंत आहे, माझं छोटं पेट व्यंकू आहे, ती आपली जबाबदारी आहे. एखादा आजार झाला की त्यामध्ये फक्त आपल्याला सफर करायचे असते पण हा आजार माझ्यामुळे इतरांना होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेते. घरात शिरल्यावर आधी कुठेही हात न लावता आंघोळीला जाते आणि नंतर वाफ घेते. लिंबूपाणी घेते. व्हिटॅमिन सी आणि मल्टिव्हिटॅमिन गोळ्या घेते, आधी मी फार निष्काळजी होते पण आता काळजीने या सगळ्या गोष्टी करते.
लॉकडाऊनमध्ये खूप आराम केला आहे. घरी हेमंतबरोबर वेळ घालवला. माझी आई माझ्याबरोबर त्यादरम्यान राहायला होती. आईबरोबर एवढा वेळ घालवता येत नव्हता कारण तिचं आणि माझं शूट, दोघींच्या वेगवेगळ्या वेळा असे होत होते. पण लॉकडाऊनमध्ये तो वेळ मिळाला. या काळात माझ्या कामवाल्या मावशींबद्दलचा आदर कित्येक पटीने वाढला. त्या आमच्याकडे अनेक वर्षं काम करतायत, त्या असल्या की आपण सहज पेल्यातून पाणी पिऊन सिंकमध्ये टाकतो कारण त्या धुणार. आता असं होतं की सुरुवातीचे एक-दीड महिना भांडी घासायचे काम माझ्याकडे होते. त्यावेळी माझ्यासकट घरच्यांनाही मी शिस्त लावली होती. नुसतं पाणी प्यायल्यावर ते सिंकमध्ये न टाकता ग्लास विसळून ठेवायचे. काही लोकांना आपण आयुष्यात ग्रॅण्टेड घेतलेलं असतं. आपले नातेवाईक, आमचे ड्रायव्हर जे गेले बारा-तेरा वर्षे आमच्याकडे काम करत आहेत, आमच्या कामवाल्या मावशी आहेत. त्या सगळ्यांचं महत्त्व कळलेलं आहे. ते आपलं आयुष्य किती सोप करतात. पण त्यांनाच आपण टेकन फॉर ग्रॅण्टेड धरतो. हे त्यांचे काम असले तरी थोडं आपणही माणुसकी दाखवून काही गोष्टी केल्या पाहिजेत.
कोरोना कोणाला सांगून होत नाही त्यामुळे शक्य तेवढी आपली काळजी घ्यायची. बाहेरून आणलेल्या भाज्या, फळं कशा धुवायच्या, कुठल्या धुवायच्या या सगळ्याबद्दल लोक जागरूक झाले आहेत. अन्न वाया घालवणे आता राहिले नाही. लोकांना अन्नाची किंमत कळलेली आहे. आता थोडसं उरलेलं अन्न टाकून देण्यापेक्षा कोणाला तरी देऊ हे कळतंय, कोरोनाने माणुसकीला पुन्हा एकदा जाग आणलीय. आधी मी नेचर बास्केटमधूनच तांदूळ घ्यायचे पण गरज पडली तेव्हा समोरचा वाणीच उपयोगी पडला. नेचर बास्केट बंद होतं. आयुष्याला आपण फार टेकन फॉर ग्रॅण्टेड धरतो. आपल्या सगळ्यांच्याच वागण्यात एक प्रकारचा माज आहे. आपल्या गरजा कमी करा. कमी गरजांमध्ये आपण जगलो आणि जगू शकतो.



























































