काळ आला होता, पण सतर्क गिरगावकरांमुळे जीव बचावला; भररस्त्यात पतीकडून पत्नीवर हल्ला

कौटुंबिक वादातून भररस्त्यात पतीने पत्नीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना मुंबईतील गिरगाव परिसरात घडली आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने त्याच ब्लेडने स्वतःवरही वार केले. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले आहेत. पतीही जखमी झाला आहे. जखमी पती-पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गिरगावातील खाडीलकर रोडवर सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली.

सागर बेलोसे असे आरोपी पतीचे तर शितल चव्हाण असे पीडित पत्नीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये काही कारणातून सतत वाद होत होते. यामुळे शितल ही गेल्या महिनाभरापासून आपल्या माहेरी राहत होती. सागरने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही शितल प्रतिसाद देत नव्हती. यामुळे सोमवारी सकाळी कामावर जात असताना त्याने तिला रस्त्यात गाठले. त्यानंतर त्याने ब्लेडने पत्नीच्या गळा आणि चेहऱ्यावर वार केले. मात्र आसपासच्या सतर्क नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पत्नीवर हल्ला केल्यानंतर बेलोसेने त्याच ब्लेडने स्वतःचे मनगट कापले.

महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तर बेलोसे याला सरकारी वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बेलोसेविरोधात व्ही पी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.