चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

68

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील वारी भरतवाडी येथे रविवारी दुपारी घडली. मयत पत्नीच्या भावाने सोमवारी रात्री उशिरा कोपरगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यास अटक करण्यात आली असून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अमोल मारुती बोर्डे याने रविवारी दुपारी १.३० ते २ वाजेच्या दरम्यान राहत्या घरात पत्नी सविता अमोल बोर्डे (वय २७ ) हिच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून खुन केल्याची घटना तालुक्यातील वारी भरतवाडी परिसरातील खोलवाट वस्ती येथे घडली. मयत सविता बोर्डे हिच्या प्रेतावर सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात अत्यंसंस्कार करण्यात आले.

त्यानंतर मयतेचा भाऊ भानुदास मल्हारी मोरे (रा .राजनगाव ता .चाळीसगाव जि.जळगाव) हा फिर्याद देण्यास कोपरगाव ग्रामीण पोलिसात हजर झाला व त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि, गेल्या एक वर्षापासून माझे दाजी अमोल बोर्डे हे माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. माझी बहिण राहत असलेल्या गल्लीत शेजारच्या लोकांशी बोलताना आढळल्यास ‘तू परपुरुषाशी कशाला बोलतेस, तुझे त्यांच्याशी काहीतरी संबंध आहेत’, असे हाणून पाडून बोलत व सतत मारहाण करीत होते. याच कारणावरून माझे दाजी व बहिण यांच्यात रविवारी दुपारी झालेल्या भांडणात दाजी अमोल यांनी माझी बहिणच्या डोक्यात, मानेवर व मनगटावर कुऱ्हाडीने घाव घातले असल्याचे सांगितले. त्याच्या फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी अमोल बोर्डे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर फर्स्ट १०७/२०१९ भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. मयत सविता बोर्डे व अमोल बोर्डे यांच्या लग्नास दहा वर्षे झाली असून त्यांना महेश (९) व अनुजा (८) वयाची दोन गोंडस मुले आहेत.

दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, उपनिरीक्षक आशिष शेळके, सचिन इंगळे यांनी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान, आरोपी अमोल यास मंगळवारी कोपरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात करण्यात आले असता न्यायालयाने आरोपी अमोल बोर्डे यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे तपास करीत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या