
पंढरपूरमधील कोर्टी गावात शेतमजुरी करणाऱ्या पती, पत्नीसह त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवार दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विजय राजकुमार लोंढ(30), प्रियांका विजय लोंढे (28) आणि प्रज्वल विजय लोंढे अशी मयत कुटुंबाची नावे आहेत. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.
कोर्टी गावात सुरेश शिवदास लाड यांचे शेत आहे. या शेतात पाटकूल (ता.मोहोळ) येथील विजय लोंढे हे कुटुंबियांसमवेत द्राक्षे बागेत शेतमजूर म्हणून काम करत होते आणि शेतातच वास्तव्यास होते. शेतातील घराजवळच एक मोठे शेततळ आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास विजय लोंढे यांचा पाच वर्षीय मुलगा प्रज्वल शेतात खेळत होता. बराच वेळा झाला तो दिसला नाही, म्हणून प्रज्वलला शोधण्यासाठी आई प्रियंका लोंढे गेली असता त्यांना प्रज्वल शेततळ्यात पडल्याचे दिसले. त्याला वाचवण्यासाठी त्या शेततळ्यात उतरल्या, मात्र त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडूल्या.
मुलगा प्रज्वल आणि पत्नी प्रियंका बराच वेळ आले नाहीत, म्हणून पती विजय लोंढे यांनी शेतात व शेततळ्याकडे जावून पाहिले असता मुलगा व पत्नी शेततळ्यात बुडत असल्याचे दिसले. त्यांना वाचविण्यासाठी विजय लोंढे यांनी शेततळ्यात उडी मारली. मात्र दुर्दैवाने विजय देखील बुडाले. एकाचवेळी पती, पत्नी आणि मुलगा यांचा मृत्यू झाल्याने कोर्टी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, विजय लोंढे, प्रियांका लोंढे आणि मुलगा प्रज्वल बराच वेळ झाला घरी आले नाहीत. म्हणून घरातील इतर सदस्यांनी शेततळ्याजवळ जाऊन पाहिले. तेव्हा तिघांचे मृतदेह शेततळ्यात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेततळे फोडून पाणी बाहेर सोडण्यात आले. त्यानंतर विजय लोंढे, प्रियांका लोंढे आणि प्रज्वलचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.































































