दुहेरीकरणाच्या कामामुळे हुतात्मा एक्सप्रेस चौथ्यांदा रद्द, 3 ते 17 ऑक्टोबर रेल्वे बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर रेल्वे विभागांत दौंड ते भाळवणी सेक्शनदरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामांमुळे पुणे-सोलापूर -पुणे धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस चौथ्यांदा रद्द करण्यात आली. ही गाडी आता 3 ते 17 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

भाळवणीजवळ दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे. काम गरण्यासाठी इंजिनीअरिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी रेल्वे प्रशासनाने हुतात्मा रेल्वे एक्स्प्रेस रद्द केली आहे. 3 ते 17 ऑक्टोबरदरम्यान ज्या प्रवाशांनी हुतात्मा एक्सप्रेसचे आरक्षित तिकीट काढले आहे, त्यांनी ते रद्द करून आपल्या तिकिटाचा पूर्ण परतावा घ्यावा, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भाळवणी ते भिगवणदरम्यान दुहेरीकरणाबरोबर विद्युतीकरणाचे कामदेखील ब्लॉकदरम्यान केले जात असल्याची माहिती आरव्हीएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. हुतात्मा एक्स्प्रेस बंद असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या सोलापूरच्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनांचे भाडे जास्तीचे असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याच्या प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस तरी हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी सोलापूरकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

भाळवणी आणि भिगवणदरम्यान सुरू असलेल्या कामाची देखभाल आणि दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. वरपर्यंत भाळवणी ते भिगवण या 55 किलोमीटरच्या सेक्शनमध्ये दररोज ब्लॉक घेऊन दुहेरीकरणाचे काम केले जाणार आहे. यासाठी ब्लास्ट मशिनद्वारे नवीन खडी टाकली जाणार आहे. रुळाखाली खडीचा एक फुटाचा थर टाकला जाणार आहे. त्याचबरोबर स्लीपर टाकल्यानंतर रूळ टाकले जाणार आहेत. त्याचबरोबर विद्युतीकरणाचे खांब लावले जाणार आहेत. त्यानंतर ओव्हरहेड वायर ओढली जाणार आहे. ही सर्व कामे दोन टप्प्यांत चालणार आहेत. सिग्नल आणि पॉईंट एकमेकांस जोडले जाणार आहेत. सर्व पॉईंट हे स्टेशन मास्तर यांच्याकडून ऑपरेट होतात की नाही याची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर रेल्वेसेवा सुरू होणार आहे.

दुहेरीकरणाच्या कामासाठी इंजिनीअरिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच गाडी सुरू करण्यात येईल. – प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर.