
संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्या हैदराबाद बलात्कार प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रक कोर्टात होणार आहे. या सुनावणीसाठी तेलंगणातील महबूबनगर या ठिकाणी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे. याप्रकरणी चारही नराधमांना अटक करण्यात आली असून चौघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रकवर चालवण्याचे आदेश दिले होते. संपूर्ण प्रकरणाचा तपास अतिशय वेगाने करण्याचे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असेही त्यांनी म्हटले होते.
चार नराधमांनी या बलात्कार प्रकरणाचा कट रचला होता. पशुवैद्यकीय महिला डॉक्टरची स्कुटी त्यांनी पंक्चर केली होती. त्यानंतर मदतीच्या बहाण्याने या नराधमांनी तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिची हत्या केली आणि मृतदेह जाळून टाकला. मानवतेला काळिमा फासणार्या या घृणास्पद कृत्यानंतर संपूर्ण देश पेटून उठला. संतापाची एकच लाट पसरली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या घटनेप्रकरणी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी बलात्कारपीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी कुटुंबीयांमध्येही पोलिसांविरोधात संताप असल्याचे शर्मा यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारपीडितेच्या कुटुंबीयांची तक्रार नोंदवून घेतली नाही. तक्रार नोंदवून घेताना हद्दीचेही कारण सांगितले. त्यामुळेच तिचा नाहक बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांचा आहे.

























































