
सामना ऑनलाईन । हैदराबाद
गत सामन्यात दिल्ली कॅपिटल्सपुढे शरणागती पत्करलेल्या सनरायझर्स हैदराबादपुढे बुधवारी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत सुस्साट सुटलेल्या चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान असेल. स्पर्धा मध्यावर आली असल्याने गुणतालिकेत सहाव्या स्थानी असलेल्या हैदराबादला स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी पुन्हा विजयाच्या पटरीवर परतावे लागेल.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ 8 पैकी 7 लढती जिंकून गुणतालिकेतील अव्वल स्थानावर आहे. या संघाने केवळ मुंबई इंडियन्सकडून एक पराभव स्वीकारलेला आहे. दुसरीकडे हैदराबादने सलामीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सकडून हार पत्करल्यानंतर विजयाची हॅटट्रिक साजरी केली, मात्र त्यानंतर पुन्हा लागोपाठ तीन लढतीत पराभव पत्करावा लागला. म्हणजेच सात लढतींत हैदराबादने चार वेळा पराभवाचे तोंड पाहिले. हैदराबादकडे डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टॉ अशी सर्वोत्तम सलामीची जोडी आहे. त्यानंतर विजय शंकर, युसूफ पठाण, मनीष पांडे व दीपक हुडा असे प्रतिभावान फलंदाजही त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीमध्येही भुवनेश्वर कुमार, राशीद खान, शाकिब अल हसन, संदीप शर्मा व सिद्धार्थ कौल असा दमदार ताफा हैदराबादकडे आहे. आयपीएलमधील कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघाकडे नक्कीच आहे.
दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीच्या कल्पक नेतृत्वाखाली चेन्नईने स्पर्धेत आतापर्यंत सुपर कामगिरी केली आहे. सलामीवीर शेन वॉटसन सातत्याने अपयशी ठरत असला, तरी फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केदार जाधव, स्वतः धोनी व रवींद्र जाडेजा यातील कोणीतरी येऊन संघाला जिंकून देतोय. सांघिक कामगिरीच्या जोरावर या संघाने अनेक चुरशीच्या लढतींत बाजी मारलेली आहे. दीपक चहर व इम्रान ताहिर या जोडीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलेय. याचबरोबर हरभजन सिंग, शार्दुल ठाकूर, मिचेल सँटनर, रवींद्र जाडेजा अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी चेन्नईच्या दिमतीला आहे. त्यामुळे हैदराबाद-चेन्नई यांच्यात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.




























































