माझा दौरा पूर्वनियोजित असल्याने महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही; नाना पटोलेंनी दिली माहिती

मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ती बैठक होत असतानाच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या भंडारा जिल्हाच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे बैठकीला ते उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू असल्याने आता नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे. माझा भंडारा जिल्हा दौरा पूर्वनियोजित असल्याने आपण महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. आपण या बैठकीला अनुपस्थित असलो तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांना बैठकीला पाठवल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यांच्या या स्पष्टीकरणाने नाना पटोले नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आम्ही आघाडी करूच
आमची 288 जागांवर संघटनात्मक तयारी सुरु झाली आहे. याचा अर्थ स्वबळावर आम्ही लढतोय असे नाही. आम्ही आमच्या मित्र पक्षाबरोबर आघाडी करूच, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात लोकसभेच्या विजयानंतर महाविकास आघाडीची कामगिरी लक्षात घेता,आघाडीचे नेते आघाडी धर्म पाळताना दिसत आहे. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुका आघाडी करूनच लढवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांना हाणला टोला
महाराष्ट्रात भाजपची मते मोठ्या फरकाने कमी झाली आहे. मोदी यांच्या चेहऱ्यावर लढले तर महाराष्ट्रात पाच टक्के फरकाने भाजप मागे आहे. जर स्वतःच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवाल तर किती टक्काने मागे जाल? असा प्रश्न करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसवांना टोला लगावला आहे.अजित पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी जिंकण्यासाठी मला काँगेसनेही मदत केली, असे विधान केले आहे. त्या विधानाला उत्तर देताना ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी स्थिती त्यांची आहे. भाजप मूळ मुद्द्यांना बगल देत आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाईचा प्रश्नावर बोलायला भाजपला वेळ नाही आहे,असेही नाना म्हणाले. जनतेचे प्रश्न दूर सारून राज्याचे तिजोरी लुटण्याचे पाप या सरकारने चालवले असल्याचा आरोपही नानांनी केला आहे. महाराष्ट्राला बरबाद करण्यासाठी तुम्हाला सत्ता दिलेली नाही. राज्याची प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज घेऊन सुरु केलेला भ्रष्टाचार थांबवा,असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. शेतकरी गरीब आणि युवकांना न्याय द्या, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.