मी कुणाला शब्द देत नाही आणि दिल्यास मागे हटत नाही, संपदाताईला न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील

संपदा मुंडेताईला न्याय मिळवून देण्यासाठी मी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याची तयारी ठेवली आहे. ताईला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही!’ अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी स्व.डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक व गृहराज्यमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत ’आरोपींना पाठीशी घालाल तर गाठ माझ्याशी आहे!’ असा सज्जड दमच दिला.

शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जाऊन स्व.डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजलगाव मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री प्रकाश सोळंके हे देखील होते. जरांगे पाटील यांनी स्व.संपदाताई यांच्या आई-वडिलांची, भाऊ तसेच चुलते व परिवारातील सर्व सदस्यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. संपदाताई ही खूप धडाडीची मुलगी होती. तिच्यावर जो अन्याय झाला आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी आपण पाहिजे ते योगदान देणार आहोत. मी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री व वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत संपर्क साधला आहे. याबाबत शासन लवकरच एसआयटीची नेमणूक करणार आहे. कुटुंबीयांसोबत चर्चा करून एसआयटीची दोन दिवसात नेमणूक होईल. योग्य तपास होऊन गुन्हेगारांना कडक शासन होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या प्रकरणात राजकीय मंडळींनी एकमेकांवर चिखलफेक न करता संपदाताईला न्याय कसा मिळेल यासाठी धडपड करावी, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या वक्तव्यावर बोलताना, याबाबत आपण अजितदादा यांच्याशीच बोलणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.