चीन, पाकिस्तानशी टक्कर देण्यासाठी ‘राफेल’सारखी विमाने पाहिजेतच!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राफेल लढाऊ जेट खरेदीवरून विरोधी पक्षांनी केंद्रातील एनडीए सरकारला घेरले असतानाच हिंदुस्थानी हवाई दल प्रमुख बी. एस. धानोआ यांनी मात्र चीन आणि पाकिस्तानसारख्या अण्वस्त्रसज्ज शेजारी देशांशी टक्कर देण्यासाठी ‘राफेल’सारखी अत्याधुनिक फायटर जेट आपल्याकडे असलीच पाहिजेत, असे प्रतिपादन केले आहे.

आपले शेजारी देश अण्वस्त्रसज्ज आहेत. शिवाय ते मोठ्या प्रमाणावर त्यांच्या हवाई दलाचे आधुनिकीकरण करीत आहेत. अशा स्थितीत हिंदुस्थानने पारंपरिक लढाऊ विमानांवर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही, असा दावा हवाई दल प्रमुख धानोआ यांनी केला. ते पुढे म्हणाले, अत्याधुनिक राफेल जेटच्या समावेशाने हिंदुस्थानी हवाई दलाचे सामर्थ्य वाढेल आणि चीन, पाकिस्तानसारख्या लष्करी शक्ती वाढवणाऱ्या देशांना वेळीप्रसंगी टक्कर देणे शक्य होईल. याआधी हवाई दल उपप्रमुख एस. बी. देव यांनीही राफेल कराराला विरोध करणाऱयांनी या कराराचे मानदंड आणि खरेदी प्रक्रिया समजून घ्यायला हवी, असे मत व्यक्त करीत या कराराचे समर्थन केले होते.

हवाई दलाला बळकट करण्याचे लक्ष्य

राफेल लढाऊ जेट आणि एस-400 विमानाच्या खरेदीने देशाच्या हवाई दलाला बलवान करण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. आपल्या हवाई दलाला सध्या 42 स्क्वॉड्रन्सची गरज आहे, पण तूर्तास आपल्याकडे फक्त 31 स्क्वॉड्रन्स कार्यरत आहेत. चीनने हिंदुस्थानी सीमेलगत रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित केले आहेत. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला ‘राफेल’सारख्या हायटेक लढाऊ विमानांची नितांत गरज आहे, असे ठाम मत हवाई दल प्रमुख धानोआ यांनी व्यक्त केले.

शेजाऱ्यांकडे आधुनिक विमाने

  • महासत्ता चीनकडे सध्या एकूण 1700 लढाऊ विमाने आहेत. त्यापैकी 800 विमाने ही फोर्थ जनरेशनची आहेत. या विमानांचा वापर चीन आपल्याविरुद्ध लढण्यासाठी करू शकतो.
  • पाकिस्तानही सर्व ‘एफ-16’ विमानांचे आधुनिकीकरण करीत आहे. ही विमाने चौथ्या आणि पाचव्या जनरेशनमध्ये बदलण्यात पाकिस्तान दंग आहे. शिवाय पाकिस्तान त्यांच्या हवाई दलात ‘जेएफ 17’ हे विमानही सामील करणार आहे.