
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटला अधिक रंजक बनवण्यासाठी काही नवे नियम अमलात आणले असून, आता शॉर्ट रन फलंदाजांला चांगलीच महागात पडणार आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही स्टॉप क्लॉकच्या नियमाची अंमलबजावणी झाल्यामुळे मूळ क्रिकेटही वेगवान होणार आहे. क्रिकेटच्या नव्या नियमांमुळे पंचांच्या अधिकारांचीही ताकद वाढली असल्याचे संकेत मिळाले आहेत. हे नवे नियम येत्या 2 जुलैपासून लागू होणार असल्याचे आयसीसीने कळवले आहे.
शॉर्ट रनला धोका आहे…
आयुष्यात शॉर्टकटने मिळवलेले यश, पैसा, कीर्ती किंवा प्रसिद्धी क्षणिक असते. तसेच काहीसे क्रिकेटमध्ये घडणार आहे. आधीच शॉर्ट रन घेणाऱया फलंदाजामुळे संघाला पाच धावांचा दंड ठोठावला जात होता. आता त्यात आणखी वाढ करण्यात आलीय. जर कुणीही विनाकारण-जाणूनबुजून शॉर्ट रन काढली असेल तर त्याच्या संघाला पाच धावांच्या दंडासह क्षेत्ररक्षण करणाऱया संघाला फलंदाजी करणाऱया दोन्ही फलंदाजांपैकी कोणत्या फलंदाजाला स्ट्राईक द्यायची हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. म्हणजेच, मोक्याच्या क्षणी काढलेली शॉर्ट रन फलंदाजी करणाऱया संघाला फार महागात पडू शकते.
कसोटीतही ‘स्टॉप क्लॉक’
एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक आल्यापासून दुसरे षटक 60 सेकंदांत सुरू करण्यासाठी प्रत्येक संघाची धावाधाव सुरू असते. आताच तशीच धावाधाव कसोटीतही दिसेल.
आयसीसीने कसोटीतही स्टॉप
क्लॉकचा नियम अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. इथेही वन डेचाच प्रकार असेल आणि दोनदा षटक सुरू करण्यास 60 सेकंदांपेक्षा अधिक वेळ लागल्यास पंचांकडून त्यांना ताकीद दिली जाईल आणि तिसऱयांदाही हा प्रकार घडल्यास त्यांना पाच धावांचा दंड सोसावा लागेल. मात्र 80 षटकांनंतर पंचांनी दिलेली ताकीद रद्द होईल आणि गोलंदाजी करणाऱया संघाला दंड बसणार नाही.
‘नो-बॉल’वरील झेलाचीही खातरजमा होणार
पंचांना नो बॉलवर झालेल्या झेलाबाबत संशय असेल आणि ते चर्चा करत असतील तेव्हा तिसऱया पंचाने जर तो चेंडू नो-बॉल घोषित केला तर फलंदाजी करणाऱया संघाला एक धाव मिळायची आणि झेल योग्यरीत्या घेतला गेला आहे की नाही याचा कुणी विचारही करत नसायचा. मात्र नव्या नियमात अशा परिस्थितीत तिसरे पंच झेल योग्य प्रकारे घेतला आहे की नाही हेसुद्धा तपासतील. जर झेल योग्य असेल तर फलंदाजी करणाऱया संघाला केवळ ‘नो-बॉल’ची एक धाव मिळेल. पण जर झेल योग्य प्रकारे घेतला नसेल किंवा सुटला असेल तर फलंदाजी करणाऱया संघाला ‘नो-बॉल’च्या धावेसह फलंदाजांनी धावून काढलेल्या धावादेखील मिळतील.
चेंडू बदलण्याचा निर्णय पंचांकडेच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. लाळेचा वापर करून चेंडू खराब करून नवीन चेंडू मिळवण्याचा प्रकार अनेकदा केला गेला आहे. मात्र आता चेंडूवर लाळ लावल्यास तो बदलायचा की कायम ठेवायचा हा अधिकार पंचांकडेच असेल. यात कोणताही संघ हस्तक्षेप करू शकणार नाही. फक्त चेंडू पूर्णपणे ओला झाला असेल किंवा त्याच्या आकारात बदल होऊन तो खराब झाला असेल तरच तो बदलण्यात येईल. म्हणजेच चेंडू खराब आहे म्हणून कोणत्याही संघाने आक्षेप घेतल्यास तो बदलायचा की नाही हे पंच स्वतःच ठरवणार.





























































