चला जगज्जेतेपद राखूया…आगामी टी-20 वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर; गतविजेत्या हिंदुस्थानचा सोप्पा ड्रॉ, जेतेपद राखण्याची संधी

आगामी वर्षी क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा हिंदुस्थानला जगज्जेते होण्याची संधी मिळू शकते. येत्या 7 फेब्रुवारीपासून हिंदुस्थान आणि श्रीलंकेत टी-20 वर्ल्ड कपची तुफान फटकेबाजी रंगणार आहे. 20 संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत हिंदुस्थानच्या गटात पैशांचा पाऊस पाडता यावा म्हणून पुन्हा पाकिस्तानला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीला उभय संघांतील लढत रंगेलच, पण ‘अ’ गटात अमेरिका, नेदरलॅण्ड्स आणि नामिबिया या संघांना स्थान देण्यात आल्यामुळे हिंदुस्थानचा सुपर एटमधील प्रवास नक्की मानला जात आहे. यंदा स्पर्धेत प्रथमच 20 संघ खेळणार असून त्यांच्या 55 लढती 8 स्टेडियमवर 8 मार्चपर्यंत खेळविल्या जाणार असल्याचे आज आयसीसीने जाहीर केले.

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच 20 संघांना स्थान देण्यात आले असून नेपाळ आणि इटली हे दोन नवे संघ प्रथमच खेळतील. स्पर्धेच्या 20 संघांना 4 गटांत विभागण्यात आले असून गटातील अव्वल दोन संघ सुपर एटसाठी पात्र होतील आणि चार-चार संघांचे दोन गट पाडून प्रत्येक संघ तीन-तीन सामने खेळेल. त्यानंतर गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. स्पर्धेतील सर्व सामने 8 मैदानांवर खेळविले जाणार असून त्यापैकी मुंबई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नई हे पाच शहरे हिंदुस्थानातील आहेत तर श्रीलंकेतील 3 मैदानांवर सामन्यांचा थरार रंगेल.

पुन्हा हिंदुस्थानपाकिस्तान लढत

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामने हायब्रीड मॉडेलनुसार खेळविले जाणार असल्यामुळे दोघांमधील सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.

हिंदुस्थानचा ग्रुप स्टेज कार्यक्रम

हिंदुस्थान 7 फेब्रुवारीला मुंबईत अमेरिका विरुद्ध वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सामना असेल, ज्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढते.

हिंदुस्थानच्या साखळी लढती

हिंदुस्थानचा सलामीचा सामना 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध खेळविला जाणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला नवी दिल्लीमध्ये नामिबिया विरुद्ध सामना होईल. 15 तारखेला पाकिस्तानविरुद्ध भिडेल तर गटातील अंतिम सामना 18 फेब्रुवारीला नेदरलँड्स विरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.

सुपर एट आणि नॉकआऊटमधील हिंदुस्थानचे संभाव्य सामने

हिंदुस्थान सुपर एटमध्ये पोहोचल्यास त्यांचे तीन सामने अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकाता येथे खेळले जातील.

हिंदुस्थानचा संभाव्य सेमीफायनल मुंबईत होणार असून दुसरी सेमीफायनल कोलंबो किंवा कोलकाता येथे होऊ शकते. हे सर्व पाकिस्तान किंवा श्रीलंका सुपर एटमधून पुढे सरसावतात का यावर अवलंबून असेल.

अंतिम सामना अहमदाबादमध्येच खेळविला जाणार आहे, परंतु पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास सुरक्षेच्या कारणास्तव अंतिम सामना कोलंबोला हलवला जाऊ शकतो, असा पर्याय कार्यक्रमात ठेवण्यात आला आहे.

रोहित शर्मा आता ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या स्पर्धेपासून गेल्यावर्षी वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत झालेल्या स्पर्धेपर्यंत 9 वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले होते आणि या नऊही स्पर्धांत खेळणारा रोहित शर्मा एकमेव क्रिकेटपटू होता. एवढेच नव्हे तर रोहित शर्मा 2007 सालच्या वर्ल्ड कपमध्ये आपले टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि ही पहिलीवहिली स्पर्धा हिंदुस्थानने जिंकली होती. त्यानंतर तब्बल 16 वर्षानंतर हिंदुस्थान रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा जगज्जेता झाला आणि रोहितने आगळावेगळा पराक्रम केला होता. दोन्ही टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेला रोहित एकमेव हिंदुस्थानी क्रिकेटपटू होता. आता तोच रोहित दहाव्यांदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालाय. मात्र यंदा तो वर्ल्ड कपचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झालाय. गेली दोन दशके तो प्रत्यक्ष टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळत होता आणि तो वेगळ्या भूमिकेतून टी-20 वर्ल्ड कप थरार अनुभवणार आहे. त्यामुळे आता त्याला अॅम्बेसेडर म्हणूनही हिंदुस्थानला जगज्जेता होताना पाहायचेय.