
टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा राजकीय-सुरक्षा वाद उसळला आहे. हिंदुस्थान दौऱयाच्या सुरक्षेबाबत बांगलादेशकडून करण्यात आलेले दावे साफ खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे आयसीसीने ठामपणे सांगत बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) चपराक दिली आहे. बीसीबीचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी आयसीसीने हिंदुस्थान दौऱयाबाबत बांगलादेशच्या ‘विशेष सुरक्षा चिंतांना’ मान्यता दिल्याचा केलेला दावा आयसीसीने थेट फेटाळून लावला आहे.
ढाक्यातील पत्रकार परिषदेत आसिफ नजरुल यांनी ‘डेली स्टार’चा हवाला देत आयसीसीच्या सुरक्षा पथकाने बीसीबीला पत्र पाठवले असल्याचा दावा केला होता. त्या कथित पत्रात तीन गंभीर मुद्दे नमूद असल्याचे त्यांनी सांगितले होते. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान संघात असल्यास निर्माण होणारा धोका, बांगलादेशी चाहते राष्ट्रीय जर्सी परिधान करून फिरल्यास उद्भवणारी परिस्थिती आणि बांगलादेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढू शकणारा सुरक्षा धोका, मात्र आयसीसीने हे सर्व आरोप फेटाळत स्पष्ट केले आहे. आयसीसीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले, आयसीसी आणि बीसीबीमध्ये सुरक्षेबाबत अंतर्गत चर्चा झाल्या असतील, पण आसिफ नजरुल यांनी मांडलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत. आयसीसीच्या कोणत्याही अधिकृत पत्रव्यवहारात मुस्तफिजुर रहमानच्या उपस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली नाही.
फेब्रुवारीत सुरू होणाऱया टी-20 वर्ल्ड कपआधी बांगलादेशने हिंदुस्थान दौऱयाबाबत अचानक अस्वस्थता व्यक्त करत आपले सामने सहयजमान श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. जेव्हा बीसीसीआयच्या निर्देशानुसार आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सकडून मुस्तफिजुर रहमानला अचानक मुक्त करण्यात आले, तेव्हा हा वाद अधिक चिघळला.





























































