
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये बुधवारी (11 फेब्रुवारी 2026) नरेंद्र मोदी मैदानावर थरारक सामना पहायला मिळाला. दोन सुपर ओव्हर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. 20 षटकांत दोन्ही संघांनी 187 धावा केल्यानंतर सामना टाय झाला. पहिली सुपर ओव्हरही (17 धावा) बरोबरीत सुटली, मात्र दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 4 धावांनी बाजी मारली. या पराभवामुळे अफगाणिस्तानचा सुपर-8 फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग खडतर झाला आहे. दरम्यान, आफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानने मोक्याच्या क्षणी केलेल्या चार चुका त्यांना चांगल्याच महागात पडल्या.
निर्णायक क्षणी धावबाद
शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 13 धावांची गरज होती. पहिल्या 3 चेंडूवर 11 धावा निघाल्या होत्या. अखेरच्या 3 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज असताना नूर अहमदने चेंडू लाँग ऑफकडे खेळला. पहिली धाव सहज पूर्ण झाली, मात्र दुसरी धावा घेताना फारुकीचा वेग मंदावला. कागिसो रबाडाने थ्रो पकडत वेगाने स्टम्प्स उडवले आणि अफगाणिस्तानचा डाव 19.4 षटकांत 187 धावांवर संपुष्टात आला. फारुकी याने दुसरी धाव घेताना डाइव्ह देखील मारली नाही, त्यामुळेही त्याच्यावर टीका होतेय.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 17 धावा वाचवण्यात अपयश
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 17 धावा केल्या होत्या. मात्र गोलंदाज फजलहक फारुकी त्या धावा वाचवू शकला नाही. डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी आक्रमक फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेला पुन्हा बरोबरी साधून दिली. अखेरच्या चेंडूवर दिलेला फुल टॉस महागात पडला.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये राशिदऐवजी ओमरझईची निवड
दुसऱ्या सुपर ओव्हरसाठी अफगाणिस्तानने अनुभवी फिरकीपटू राशिद खानऐवजी वेगवान गोलंदाज अझमतुल्लाह ओमरझईवर विश्वास दाखवला. मात्र हा निर्णय उलट ठरला. ट्रिस्टन स्टब्स आणि डेविड मिलर यांनी सलग षटकारांची बरसात करत 23 धावा वसूल केल्या. या ओव्हरमध्ये ओमरझई याने अनेक फुल टॉस टाकले.
गुरबाझऐवजी नबीला फलंदाजीस पाठवण्याचा निर्णय
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने स्फोटक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाझ याच्या आधी मोहम्मद नबीला सलामीला पाठवले. गुरबाझने मुख्य सामन्यात 42 चेंडूत 84 धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र नबी पहिल्याच काही चेंडूंमध्ये बाद झाला. त्यानंतर गुरबाझने सलग तीन षटकार ठोकले. मात्र अखेरच्या चेंडूवर 5 धावा हव्या असताना तो बाद झाला आणि अफगाणिस्तानच्या हातातून विजयाचा तोंडचा घास आफ्रिकेने हिरावून घेतला.


























































