
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने शनिवारी कबुली दिली की, त्यांनी त्यांच्या गटातील काही संघांना कमी लेखले होते. मात्र, आता त्याचा संघ टी-२० विश्वचषकाच्या ‘सुपर ८’ फेरीमध्ये आपला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी सज्ज असल्याचे त्याने म्हटले आहे.
गट फेरीत इंग्लंडची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यांना सहयोगी देशांविरुद्ध विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, तर वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागला. नेपाळविरुद्ध तर इंग्लंडचा संघ पराभवाच्या छायेत होता; पण शेवटी चार धावांनी विजय मिळवण्यात त्यांना यश आले. स्कॉटलंड आणि इटलीविरुद्धही त्यांना विजयासाठी झुंजावे लागले होते. रविवारी ‘सुपर ८’च्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.
ब्रूक म्हणाला की, आमच्यासाठी या स्पर्धेची सुरुवात थोडी कठीण राहिली. आम्ही कदाचित काही संघांना कमी लेखले आणि त्यांनी आम्हाला चोख प्रत्युत्तर दिले. सुदैवाने आम्ही पहिला टप्पा पार करू शकलो. आता आम्ही ‘सुपर ८’मध्ये आहोत आणि आमचे पूर्ण लक्ष आता याच फेरीवर आहे. आम्ही याकडे आता एक नवीन स्पर्धा म्हणून पाहत आहोत. मागील फेरीतले गुण पुढे नेले जात नसल्यामुळे ही पूर्णपणे एक नवीन सुरुवात आहे.
आक्रमक दृष्टिकोनावर भर ब्रूकने मान्य केले की, गट फेरीत त्यांच्या फलंदाजांनी गरजेपेक्षा जास्त सावध पवित्रा घेतला होता; पण आता ते अधिक आक्रमक खेळ करतील. तो म्हणाला की, आम्ही फलंदाजी करताना थोडे जास्तच सावध होतो. काही विशिष्ट परिस्थितीत आम्ही अधिक धाडसी होऊ शकलो असतो आणि आमच्या तळाच्या फलंदाजांवर अधिक विश्वास दाखवू शकलो असतो.
श्रीलंकेचे आव्हान
श्रीलंकेच्या संघाबद्दल बूकने सांगितले की, मी हे शिकलो आहे की तुम्ही कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ शकत नाही. श्रीलंकेचे काही फलंदाज सध्या खूप चांगली फलंदाजी करत आहेत. पथुम निसांका चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आम्ही पॉवर प्लेमध्ये लवकर बळी घेण्याचा प्रयत्न करू.

























































